नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होईल अशी चर्चा होती. आज अखेर मुंबईत या युतीवर शिक्का मोर्तब झाला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवन येथे पत्रकार परिषद घेत युती केल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील या युतीवर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना नाशिकमध्ये मात्र शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून हा आनंद साजरा केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत हा आनंद साजरा केला आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी पदाधिकऱ्यांनी मात्र भविष्यात काय होणार याबाबतही स्पष्टच सांगून टाकलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेले प्रकाश आंबेडकर हे एकत्र आल्याने राज्यात एक मोठी राजकीय ताकद निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
भाजपसह शिंदे गटाला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी मोठी ताकद निर्माण झाली आहे. देशात एक मोठी शक्ती निर्माण झाली असून देशामध्ये देखील नवीन इतिहास घडणार असल्याची भावना वंचितचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे यांनीही यावेळी नाशिक महानगर पालिकेत सत्तांतर होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती इतिहास घडवेल असं मात मांडलं आहे.
ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात युतीच्या घोषणा झाल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्ते लागलीच एकत्र एकूण जल्लोष साजरा करू लागले आहे. आगामी महानगर पालिका आणि इतर निवडणुकीबाबतही भाष्य करू लागले आहे.
पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात नव्या युतीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतांना नाशिकच्या थंडीतही शिवशक्ती आणि भीमशक्ती जल्लोष होऊ लागल्याने आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.