नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ( PHC ) एका महिलेची प्रसूती डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने तिच्या आईलाच करावी लागल्याची धक्कादायक बाब समोर आली होती आणि त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी दोन आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल ( CEO Ashima Mittal ) ह्या अंजनेरी येथील कारवाई करून न थांबता त्यांनी आता आरोग्य विभागच रडारवर घेतला आहे. लाखो रुपयांचे पगार घेणारे कर्मचारी नेमकं काय काम करतात काय याचा शोध घेत आता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत आशिमा मित्तल आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अडचणी जाणून घेत आहे. याशिवाय रुग्णांना उपचार करत असतांना हलगर्जीपणा पुढील काळात होणार नाही यासाठी एक प्रकारे तंबीच देत आहे.
नुकतेच जिल्हा परिषदेच्या संपूर्ण आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आशिमा मित्तल यांनी एक सूचना पत्रक काढले आहे. ह्या पत्रकाचा आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या पत्राने खळबळ उडाली आहे.
नुकतेच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने एका महिलेची प्रसूती करण्यासाठी कुणीही नसल्याने गर्भवती महिलेच्या आईनेच आपल्या लेकीची प्रसूती केली होती.
त्यानंतर राज्य महिला आयोगाने देखील याची दखल घेतली होती. त्यानंतर दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता कामचुकार आरोग्य अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी निलंबनाची कारवाई न होता बदलीची कारवाई केली होती.
त्यानंतरही जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारी जिल्हा स्तरावर आलेल्या होत्या. मात्र, तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र आता अंजनेरी प्रकरणाने पुन्हा एका जुन्या प्रकरणाची चवीने चर्चा होत आहे.
दरम्यान आता मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आरोग्य विभाग रडारवर घेतलाच आहे तर एकदा निवासी आरोग्य अधिकाऱ्यांना शिस्त लावली तर अनेक समस्या सुटतील अशी चर्चा आरोग्य विभागात सुरू झाली आहे.