अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्याच्या मुलीने साता समुद्रापार भरारी घेतलीय. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील श्रद्धा गुंजाळ हिला नासात घेतलेल्या प्रशिक्षणानंतर आता युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये जगभरातून निवडलेल्या सहा जणांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. भारतातून निवड झालेली श्रद्धा ही एकमेव भारतीय आहे. तिच्या या यशाच सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धाने मुंबई येथे नुकतीच भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिला शुभेच्छा देत राज्य सरकार तिच्या पाठीशी असल्याच आश्वासन दिले आहे.
बालपणापासूनच अंतराळाबद्दल प्रचंड कुतूहल आणि आकर्षण असलेल्या श्रद्धाचे प्राथमिक शिक्षण संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण संगमनेरच्या सह्याद्री संस्थेच्या हायस्कुल मध्ये झाले.
तिने घरात मार्गदर्शन करणारे कोणी नसल्याने अंतराळवीर बनण्यासाठी आवश्यक माहिती वृत्तपत्रे आणि इंटरनेटच्या माध्यमातून जमवली. स्वप्नपूर्तीचा पुढचा टप्पा सर्वच पातळ्यांवर कठीण होता. तरीही तिने त्यावर मात करत आज उज्ज्वल यश मिळवलं आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची, त्यात शिक्षणासाठी इतका खर्च करून बाहेर कशाला पाठवायचे? तिच्या कमाईचा तुम्हाला काय उपयोग? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार पचवून आई-वडिलांनी ठाम भूमिका घेत प्रतिकुल परिस्थीतीत श्रद्धाला साथ दिली.
वडील भगवान गुंजाळ आणि अहिल्या गुंजाळ यांनी श्रद्धाला मोठी साठ दिली आहे. श्रद्धाने बालपणापासून कल्पना चावला यांना रोल मॉडेल मानलं आहे. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉईड सर्च कॅम्पेनमध्ये सहभाग घेत तिने पृथ्वीच्या दिशेने येणारा घातक ॲस्ट्रॉईड शोधला आहे.
त्याला २०२० पीआर १३ नावही देण्यात आले. या संशोधनाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि डॉ. अब्दुल कलाम वर्ल्ड ऑफ रेकॉर्डस हे दोन सन्मान तिला मिळाले आहे. यातूनच ‘नासा’च्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅमसाठी केनेडी स्पेस सेंटर येथे तिची निवड झाली आहे.
श्रद्धाची मागील महिन्यात युरोपियन स्पेस एजन्सीसाठी (ESA) पोलंडमध्ये एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. यात इटली, स्वित्झरलँड, जर्मनी, यूएसए, रशिया आणि भारत या सहा देशांचा समावेश आहे. भविष्यात चंद्र आणि मंगळावर जाणाऱ्या यानांचा अभ्यास आणि त्यातील सिम्युलेटर्सवर काम करायची संधी तिला मिळणार आहे.
एकूणच कठीण प्रसंगात श्रद्धाने मिळवलेले यश बघता तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतुक केल्याने तिच्या स्वप्नांना आणखी बळ मिळाले आहे.