अहमदनगर : अवकाळी पावसाचा फटका मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणलाही बसला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातातोंडीशी आलेली पीकं वाया गेल्याने आता आम्ही कसं जगायचं असा सवाल नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर दौऱ्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगत बळीराजाला दिलासा दिला आहे. त
महाएक्स्पो कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगरला असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभा असल्याचे सांगत शेतकऱ्यांना त्यांनी सरकारचा विश्वास दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी बोलताना सांगितले की, शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे. आमच्या सरकारचा जो आमचा कारभार आहे तो शेतकरी हितासाठीच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाएक्सपोसारख्या कार्यक्रमातून खूप काही शिकता येते असल्याचे सांगत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे त्यांनी कौतूकही केल.
सहकार चळवळीचा पाया या नगर जिल्ह्यात रोवला गेला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला वेगळा वारसा आहे. या अशा कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असते.
त्यामुळे अशा एक्स्पोच्या आयोजन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे ज्या ज्या लोकांनी आयोजन केले आहे त्या सर्व टिमचे अभिनंदनही करतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांच्या जनावरांवर आलेले संकट आणि लंपीसारख्या आलेल्या आजारानंतर पशुधन वाचवण्याचा विडा उचलला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही कारण हे सरकार शेतकऱ्यांचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.