अहमदनगर/संगमनेरः संगमनेर तालुक्याच्या (Sanmaner Taluka) पठार भागातील अकलापूर गावातंर्गत असणाऱ्या मुंजेवाडी शिवारात वादळी वाऱ्यात भिंत अंगावर पडून तीन जण ठार (Three killed) तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना 9 जून रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर तालुक्यातील मालदाड (Maldad) येथे झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यात वादळी पावसाने हाहाकार उडवून दिला असून परिसरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरातून जाणाऱ्या नाशिक मार्गावर अनेक मोठी झाडे कोसळली आहेत तर शासकीय विश्रामगृह परिसरातही झाडे उन्मळून पडली आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की,मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुधवडे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. तर गुरुवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वारे सुटले होते, त्यानंतर गारांचा पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यामुळे आणि पावसामुळे दुधवडे हे कुटुंबीयांसोबत घरात बसले होते.
यावेळी अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडून लांबवर जाऊन पडले तर त्याच दरम्यान घराच्या भिंतीही कोसळल्या. घराच्या या भिंती अंगावर पडल्याने विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय 75), हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय 67), साहील पिना दुधवडे (वय 10) हे जागीच ठार झाले. तर वनिता पिना दुधवडे ( वय 8), मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय 70) हे जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती समजताच महसूल मंडल अधिकारी इराप्पा काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, पोलीस नाईक संतोष खैरे, गणेश लोंढे, प्रशांत आभाळे यांच्यासह मनसेचे किशोर डोके, शिवसेनेचे जनार्दन आहेर, पोलीस पाटील सीताराम आभाळे, सरपंच अरुण वाघ, संतोष देवकर, संपत आभाळे, अशोक वाघ यांच्यासह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना सरकारी रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृतांना खासगी रुगणवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने पठार भागातून हळहळ व्यक्त होत आहे.