अहमदनगर | आयुर्वेदिक (Aurvedik) पद्धतीने कुटुंब नियोजन करण्याच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील संशोधकांना मोठे यश प्राप्त झाले आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी लवकरच शंभर टक्के आयुर्वेदिक औषध उपलब्ध होऊ शकते. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. आशा कदम – सावंत (Dr. Asha Kadam) यांनी तब्बल दहा वर्षे संशोधन करून हे आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषध शोधून काढलंय. या संशोधनात त्यांना अहमदनगर महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ बाळासाहेब गायकर यांचं मार्गदर्शन लाभलं. वनस्पतीशास्त्र विषयाचा अभ्यास करीत असताना आशा कदम यांना शिक्षकांकडून संशोधनाची प्रेरणा मिळाली.या औषधाचा कोणताही साईड इफेक्ट नाही असा दावा डॉ कदम यांनी केला. अहमदनगरला वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. डॉ. आशा कदम-सावंत आणि प्रा. डॉ. बाळासाहेब गायकर यांनी आयुर्वेदीक गर्भनिरोधक औषधाच्या फॉर्मुल्याचे अर्थात हर्बल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर्मुल्याचे पेटंट मिळवले आहे. त्यांच्या या संशोधनाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय.
डॉ. आशा कदम यांना दहा वर्षांच्या संशोधनानंतर गर्भधारणा टाळण्याचा हा आयुर्वेदिक फॉर्म्युला मिळाला आहे. आता त्यांना भारत सरकारचे पेटंटदेखील मिळाले आहे. यापुढे आता विश्वासार्ह औषध निर्माता कंपनीच्या सहकार्यानतून औषधी बाजारात उतरण्याची त्यांची तयारी आहे. हे औषध टॅबलेट आणि लिक्विड स्वरुपात उपलब्ध असेल. वैज्ञानिक कसोट्यांवर त्यांचा हा फॉर्म्युला तपासून घेण्यात आला आहे. आधी उंदरांवर या औषधांचा प्रयोग केला गेला. त्यात शंभर टक्के यश मिळाल्यानंतर काही महिलांवर याचा प्रयोग करण्यात आला. बहुतांश महिलांची गर्भधारणा याद्वारे टाळण्यात आली. डॉ. कदम यांच्या नावाने 21 रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत.
डॉ. कदम यांनी सांगितले की, हा औषधांचा फॉर्म्युला 100 टक्के आयुर्वेदिक आहे. औषधी वनस्पतींपासून ते तयार करण्यात आले आहे. या औषधींसाठी पाच वनस्पतींचे एकत्रित कॉम्बिनेशन तयार केले आहे. बहुतांश आदिवासी महिलांना या वनस्पतींची माहिती असते. त्यांचा वापर या महिलादेखील करतात, अशी माहिती डॉ. कदम यांनी दिली. डॉ. कदम यांच्या या संशोधनामुळे कुटुंब नियोजनाच्या प्रयत्नांत मोलाची भर पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या-