05 सप्टेंबर 2023 : साल होतं 2016 अन् दिवस होता 13 जुलैचा… या दिवशी माणुसकीला काळिमा फासणारी अन् अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला ती निघृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. याचेच पडसाद मोर्चे, बंद अन् आंदोलनांमधून दिसून आले. या सगळ्यानंतर महाराष्ट्रात एक मोठा लढा उभा राहिला हा लढा होता मराठा आरक्षणाचा… या बलात्कार अन् हत्येच्या या घटनेनंतर महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला अन् मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरु झाला. लाखोंचे मोर्चे निघाले. याच कोपर्डीत आज पुन्हा एकदा आंदोलन केलं जात आहे. हे आंदोलन आहे ते जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा निषेध नोंदवण्यासाठी…
अहमदनगरच्या कोपर्डी गावात आजपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आलं आहे. जालनाच्या अंतरवली येथील लाठीचार्जच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्यात येत आहे. कोपर्डीतील ग्रामस्थ जालन्यातील या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र जमले आहेत. कोपर्डीतील नागरिकांनी उपोषण सुरु केलं आहे. मराठा क्रांती मोर्चाची ज्या कोपर्डीतून सुरुवात झाली होती, तिथेच हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.
जालन्यातील लाठीचाराचा ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. बंदी पुकारण्यात आला आहे. कोल्हापूर शहरात आज बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील दसरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी बंदच्या आवाहनासाठी थोड्याच वेळात दसरा चौकात जमले आहेत. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेणारच, असा मराठा समाज बांधवांचा निर्धार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे.
जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज माळशिरस तालुका कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शाळा कॉलेजला देखील सुट्टी देण्यात आली आहे. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तालुक्यात वेळापुर , अकलुज अशा वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलनला सुरुवात झाली आहे. तसंच जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा आणि पोलीस अधीक्षक यांना निलंबित केलं जात नाही. तोपर्यंत माळशिरस तालुक्यामध्ये कोणत्याही मंत्र्यांना मराठा समाज फिरकू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाजी साखळकर यांनी ही माहिती दिली आहे.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सराटी गावात जाणार आहेत. आंदोलन स्थळी जात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाची अतिरिक्त पोलीस महासंचालक चौकशी करणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकाला मुख्यमंत्र्यांनी जालना लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करण्याची आदेश दिले आहेत.त्याच अनुषंगाने आज घटनास्थळी जात आंदोलनकर्त्यांशी संजय सक्सेना चर्चा करणार आहेत.