रस्ता देत नाही तर हेलिकॉप्टर द्या, खड्ड्यांवरून उडत जाऊन अंतर पार करू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच धाडलं पत्र

| Updated on: Dec 16, 2022 | 10:44 AM

या पत्राची सध्या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चा सुरू आहे. तालुक्यातील हनुमान वस्तीवर अनेक वर्षांपासून मागणी करूनही रस्ता होत नसल्याने वैतागलेल्या नागरिकाने अशी व्यथा मांडली आहे.

रस्ता देत नाही तर हेलिकॉप्टर द्या, खड्ड्यांवरून उडत जाऊन अंतर पार करू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच धाडलं पत्र
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदनगरः अनेकदा मागणी करूनही स्थानिक प्रशासनाने गावाला रस्ता दिला नाही. त्यामुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच धाव घेतली आहे. गावातील नागरिकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र पाठवलंय. गावाला तुम्ही रस्ता देऊ शकत नसाल तर आता हेलिकॉप्टरच द्या. खड्ड्यांतून आम्ही जाऊ शकत नाहीत, निदान हेलिकॉप्टर (Helicopter) मिळालं तर इथलं अंतर उडत उडत पार करू, अशा आशयाची अजब मागणी गावकऱ्याने केली आहे.

सामान्यांचं सरकार, सामान्यांचे मुख्यमंत्री अशी प्रतिमा असलेले एकनाथ शिंदे या गावकऱ्याच्या मागणीला कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्र्यांना त्यांनी पाठवलेल्या पत्राची सध्या राज्यात चर्चा सुरु आहे.

कुणी केली मागणी?

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सालवड येथे खराब रस्त्याच्या मागणीसाठी एका माजी सैनिकाने अजब फंडा शोधून काढलाय. गावात रस्ता होत नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हेलिकॉप्टरसाठी अर्थसाह्य करण्याची मागणी केली आहे.

तर या पत्राची सध्या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चा सुरू आहे. तालुक्यातील हनुमान वस्तीवर अनेक वर्षांपासून मागणी करूनही रस्ता होत नसल्याने वैतागलेल्या दत्तू भापकर या माजी सैनिकाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.

तुम्ही रस्ता देऊ शकत नाही तर हेलिपॅड आणि हेलिकॅप्टरसाठी अर्थसहाय्य करण्याची मागणी केली आहे. सालवडगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर साडेतीनशे लोक असलेल्या हनुमान वस्तीवर जाण्यासाठी साधा रस्ता आहे.
मात्र पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होते. तहसीलदारांकडे वारंवार मागणी करूनही रस्ता होत नाही. त्यामुळे वैतागलेल्या भापकर यांनी मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहीत हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.