शिर्डी, अहमदनगर | 23 ऑगस्ट 2023 : नाफेड कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. नाफेडच्या माध्यमातून होत असलेली खरेदी परवडणारी असेल तर सरकारचं कौतुक केलं पाहिजे. पण अत्यंत मर्यादित कांदा खरेदी ते करणार आहेत. मदत करताना सुद्धा पुरेशी करायची नाही. अशी सरकारची मानसिकता आहे. ग्राहकाला कांदा स्वस्त मिळाला पाहिजे. असा त्यांचा मानस आहे.एक तर शेतकऱ्याला किंवा ग्राहकाला अनुदान सरकारने दिलं पाहिजे. केवळ मत आणि निवडणुकीचं राजकारण सध्याचं मोदी सरकार करत आहे. जर शेतकऱ्याचा कांदा बंदरात पडला असेल तर त्याचं काय करायचं याच सुद्धा उत्तर नाही, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या कांदा खरेदीच्या निर्णयावर टीका केली आहे.
राज्याला मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री दोन्ही आहेत. ते प्रयत्न सुद्धा करतायेत. कांद्याचा निर्णय जपानमध्ये होतो. जपानमधून ट्विट झाल्यानंतर सरकारला कळतं. श्रेय फक्त भाजपला मिळावं हाच यांचा प्रयत्न आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या कांदा खरेदीच्या निर्णयावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.
ज्याला कांदा परवडत नाही. त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडणार आहे?, असं मंत्री दादा भुसे म्हणाले. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरही बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. शेतकऱ्याला मारून ग्राहकाला स्वस्त कांदा दिला पाहिजे असं धोरण नकोय. सत्ता आली की माणसाला भान राहत नाही. असा अनेकांचा अनुभव आहे. आताही तसंच होताना दिसत आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणालेत.
चांद्रयान मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण चांद्रयान 3 चं लँडर आज चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. अवघ्या देशाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं आहे. यावरही बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतात संशोधनाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून सुरु आहे. टप्प्याटप्प्याची वाटचाल करत शास्त्रज्ञ पुढे जात आहेत. आज लँडिंगचा विषय खूप काळजीचा आहे. मात्र आपल्या सगळ्या भारतीयांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे ही मोहिम यशस्वी होईलच, असं बाळासाहेब थोरात म्हणालेत.