अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur) शहरात सकाळी भीषण अपघात झाला. शहरातील बेलापूर नाक्यावर टँकरखाली (Tanker Accident) चिरडल्यामुळे बाप-लेकीचा करुण अंत झाला. श्रीरामपुरातील बेलापूर (Belapur) नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार वेशीपासून जवळच असलेल्या श्रीकृष्ण मंदिरासमोर सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या टँकर खाली एक मोटर सायकल आली. यामुळे दोघांची टक्कर झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, टँकरच्या धडकेत मोटरसायकलचा चक्काचूर झाला. यात मोटरसायकलवरील वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे श्रीरामपूरमध्ये एकच खळबळ माजली.
या घटनेची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूरकडून- बेलापूरकडे चाललेला टँकर क्रमांक एमएच 43 यु 3335 या टँकरचा आणि मोटर सायकलचा अपघात झाला. बेलापूरकडून -श्रीरामपूरकडे येणारी मोटर सायकल बजाज सिटी हंड्रेड क्रमांक एम एच 17 सीएन 7131 ही गाडी आली. त्यामुळे मोटर सायकलवर मागे बसलेल्या तरुणीचा टँकरच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. टँकरने जवळपास शंभर फुटापर्यंत या तरुणीला फरफटत नेले. या अपघातानंतर टँकर चालक जागेवरून पसार झाला आहे.
सदर अपघाताची माहिती समजताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह साखर कामगार रुग्णालयात पोहोचवला. या अपघातात दिपाली बाळासाहेब गायकवाड, वय वर्षे 20 तर तिचे वडील बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड वय वर्षे 50 यांचा मृत्यू झाला. मोटरसायकलवरील आणखी एक जखमी म्हणजेच बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अजित बाळासाहेब गायकवाड याला उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. सदर घटनेत टँकर चालक फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत लिंबाचे झाड तोडत असताना अंगावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील बाब्रस मळा येथे ही गंभीर घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्मचारी येथील झाड तोडत असतानाच वन विभागाचे एक कर्मचारी तेथून दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांच्या अंगावर झाड पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानदेव बाबुराव ससाणे असे मयत वन कर्मचाऱ्याचं नाव आहे.