देशात लोकसभा निवडणूक होतेय. अशात राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर भाष्य केलं. तसंच सांगलीच्या जागेवरबही त्यांनी दावा सांगितला आहे. फक्त महाविकास आघाडीत नाही तर महायुतीतही तिढा सुरू आहे. आमच्याकडे फक्त तिढा… तिकडे मात्र अनेक तिढे आहेत. आमचे सर्व तिढे सुटतील आणि आम्ही एकजुटीने काम करू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. चर्चेतून प्रश्न मिटतील. पण आम्ही आजही सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहोत, असं थोरातांनी स्पष्ट केलं. ते अहमदनगरमधील शिर्डीत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर पडलेले नाहीत. चर्चा सुरू असून वरिष्ठ मार्ग काढतील. वंचित महाविकास आघाडीत दिसावी अशी माझी इच्छा आहे. महाराष्ट्रात आघाडीला आणि देशात इंडियाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे अपेक्षा वाढणे साहजिक आहे. या सर्वातून लवकर मार्ग निघेल, असं म्हणत थोरातांनी वंचितला महाविकास आघाडीत घेण्यावर प्रतिक्रिया दिली.
अजित पवार गटाचे नेते, आमदार निलेश लंके हे निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटात येतील आणि लोकसभा निवडणूक लढतील, अशी दाट शक्यता आहे. त्यावर बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली. निलेश लंके उमेदवारीसाठी तयार आहोत. त्यांची एन्ट्री जोरदार करायची आहे. निलेश लंके उभे राहतील आणि विजयी होतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
मनसे आणि भाजपची युती होण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा दोन्ही पक्षांमध्ये सुरु आहे. त्यावर थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचे आणि लावरे व्हीडिओचे सर्वांनाचं कौतुक होते. मात्र ते राज ठाकरे आता दिसत नाहीत. ते महायुतीत गेले तर जनतेत त्यांचा प्रभाव ओसरलेला दिसेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राजकारणासाठी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील महायुती सरकार अपयशी ठरलं आहे. भ्रष्टाचार आणि अशांतता वाढली आहे. मात्र जनता याला नक्की उत्तर देईल, असं थोरातांनी म्हटलं.