कुणाल जायकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, अहमदनगर | 07 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्रात मराठी माणसांनी निर्माण केलेले दोन पक्ष फोडले. आता लोक म्हणतात उरलेल्या पक्षाचं काही होऊ शकतं. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्व कष्टाने पक्ष स्थापन केले. हे दोन्ही पक्ष फोडण्याचं काम झालं. आमदारांना बाजूला करायचे काम झालं. स्वतः च्या ताकदीवर पक्ष काढायचा याची चर्चा झाली नाही. मात्र सरकार यंत्रणानी पक्ष फोडण्यास मदत केली. भारतीय लोकशाहीची घंटा वाजायला सुरवात झाली आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
रोहित पवारांनी विशेष लक्ष घालून काम केलं. आज तुमच्या पदाची घोषणा केली. मात्र कोणत्या पक्षाचे हे सांगू शकलो नाही. लवकरच पक्षाची नावाची घोषणा होईल. आज आपण पद घेतले त्याला पवार साहेबांना साजेसं नाव पक्षाला मिळेल. तुम्हांला चिंता करायचे काम नाही रोहित पवार खणखणीत नाणं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
ही लढाई खूप मोठी आणि लांबची आहे. पूर्वी लोकांना पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ येत नव्हती. आज पोलीस ठण्यात गोळीबार होतो. त्याच्यावर उपचार सुरु आहे. मात्र काय झालं? हे अद्याप सांगितलेलं नाही. जमिनी हडप करणं, जमिनी विकणं, परवानगी न घेणं हे प्रकार ठाण्यात घडतं आहेत. एक आमदाराने गोळीबार केला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत आहे. तर त्याची चौकशी झाली पाहिजे. मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले. मात्र त्यांच्या हातात काही नाही, असा घणाघात जयंत पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्राचा बिहार झाला आहे! सध्या बिहारमध्येही असं होत नाही. एक आमदार म्हटले छगन भुजबळ यांच्या पेकाटात लाथ मारून बाहेर काढा असेल म्हटले मात्र त्याला कोणी तंबी दिली नाही. आता आमदार सांभाळताना नाकी नऊ येत आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी उल्हासनगरमधील गोळीबारावर प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. ओबीसी आरक्षणावर कोणी बोलत नाही. धनगर आरक्षणच काय झालं? सामाजिक अस्थिरता निर्माण झालीये. या सर्व गोष्टीला सरकारचा पाठिंबा आहे. असं चित्र आम्ही 40 वर्षांत पहिलेलं नाही, असं जयंत पाटील म्हणाले.