अहमदनगर | 14 मार्च 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा होत आहे. आज निलेश लंके यांच्या पुस्तकाचं पुण्यात प्रकाशन होत आहे. शरद पवारांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होईल, असं बोललं जात आहे. या कार्यक्रमादरम्यान निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती आहे. या चर्चांवर निलेश लंके यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं, असं निलेश लंके म्हणालेत. लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आमचं काहीही नियोजन नाही. माझं याबाबत कुणाशीही काहीही अधिकृत बोलणं झालेलं नाही, असं निलेश लंके म्हणाले.
निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटात आज प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करतील अशी माहिती आहे. अहमदनगरमधूनशरद पवार निलेश लंके यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. मागच्या कित्येक दिवसांपासून लंके पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगते आहे. यावर निलेश लंके यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पक्षांतर वगैरे असा काही विषयच नाही. आम्ही सगळे एकच आहोत, असं ते म्हणाले.
राज्यसभेची मतदान प्रक्रिया सुरु होती. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या. विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तो दिवस गेला अन् दुसऱ्या दिवशी बातमी आली की एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचे फोन बंद आहेत. अशाही काही घटना घडतात. त्यामुळे राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असं निलेश लंके म्हणाले.
कोरोना काळात आम्ही चांगलं काम केलं. लोकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी काही निर्णय घेतले. या काळात आम्हाला वेगवेगळे अनुभव आले. काही वेळेला अक्षरश: डोळ्यात पाणी आलं. या सगळ्याबाबत मी एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात मी सगळे अनुभव लिहिले आहेत. हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. हे पुस्तक आपण जरूर वाचावं आणि आपली प्रतिक्रिया दिली आहे, असं आवाहन लंके यांनी केलं.