अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते निलेश लंके निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यानंतर निलेश लंके यांनी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढली आहे. जनसंवाद साधण्यासाठी लंके यांनी ही यात्रा सुरु केली आहे. या यात्रेदरम्यान लंके यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्याकडे काही सीनियर लोक आहेत. मात्र चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे. सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. वेळ आली की, मी सगळं सांगेल, असं निलेश लंके म्हणाले.
लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी स्वाभिमानी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. शुभ कार्य करायचं म्हणलं की देवदर्शन केलंच पाहिजे.त्यामुळे मोहटा देवीला नतमस्तक होऊन आज यात्रेला सुरवात करत आहे. राजकारण ही विचारांची लढाई आहे. ती विचारांनीच लढली पाहिजे. एखादा कार्यकर्ता विरोधात गेला की त्याची चौकशी लावा. गुन्हे दाखल करा. व्यक्तिगत चौकशी लावली. असले प्रकार वाढले आहेत. सर्वसामान्य माणूस पुढे आले की त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण जनतेची ताकद माझ्या पाठीमागे आहे. लोकांच्या पाठिंब्याने मी खासदार होणारच, असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.
आपला नगर दक्षिण 75 टक्के दुष्काळी भाग आहे. मी बोलतो ते करतो. मात्र अनेकजण दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करता… मी निवडून आल्यावर प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभारणार आहे. त्यांनी अनेक आश्वासन दिली मात्र ते पुन्हा पहिलाच मिळाले नाही. साखळीई योजना आणली नाही. ताजनापूर पाणी योजना आणतो म्हणाले मात्र आणली नाही. पाथर्डी-नगर महामार्ग मी उपोषणाला बसलो, तेव्हा पूर्ण झाला. मात्र ते हेलिकॉप्टरमध्ये फिरत होते, असं म्हणत निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.
माझ्या उमेदवारीचा सर्वात जास्त आनंद शिवसैनिकांना झाला आहे. नगर दक्षिणच्या जास्तीच जास्त गावात जाऊन आडीअडचण समजून घेणार आहे. आता हा रथ दिल्लीलाच जाऊनच थांबणार आहे. हा जगनाथचा रथ आहे. अनेक जण पाच वर्ष फिरत नाही तर साखर-गुळ वाटायला येतात. तुम्हाला कुणी संसदमध्ये नेलं नाही. मात्र मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल. विधानसभेत देखील मी चार पाचशे लोक नेत असतो. यांनी फक्त त्रास देण्याचं काम केलं. अनेकांचे कामे अडवली, असा टोला निलेश लंके यांनी सुजय विखे यांना लगावला आहे.