अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपळगाव उज्जैनी येथील शाळेतील टेरेसवर एका विद्यार्थिनीला तिचे हातपाय आणि तोंड बांधून ठेवल्याचं प्रकार समोर आलाय. याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थिनीला अशा प्रकारे कोणी बांधून ठेवलं? त्याचा नेमका हेतू काय होता असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत.
अहमदनगरपासून जवळच असलेल्या पिंपळगाव उज्जैनी येथील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे हात पाय आणि तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काल सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचे तोंड दाबून तिला शाळेच्या टेरेसवर नेऊन तिचे हात, पाय आणि तोंड बांधून ठेवले.
साडेपाच वाजता टेरेसवरून आवाज येत असल्याने गावातील काही ग्रामस्थ शाळेच्या टेरेसवर गेले असता त्यांना ही मुलगी हात- पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मुलीला सोडवतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासानंतरच नेमका हा प्रकार काय आहे याची सत्यता समोर येईल.