कुणाल जायकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर | 27 ऑक्टोबर 2023 : ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बबनराव ढाकणे हे मागच्या तीन आठवड्यापासून निमोनिया आजाराने त्रस्त होते. अहमदनगरमधील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. हृदयविकाराच्या झटक्याने आज त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. बीड, अहमदनगर जिल्ह्यात बबनराव ढाकणे यांनी मोठं काम उभं केलं. पाथर्डीसाठी त्यांनी सामान्य लोकांच्या हितासाठी काम केलं. आज बबनराव ढाकणे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे.
बबनराव ढाकणे यांचं काल रात्री निधन झालं. पाथर्डीतील हिंदसेवा वसतिगृहात त्यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणात आहे. आज दुपारी एक वाजेपासून ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत बबनराव ढाकणे यांचं यांचं पार्थिव हिंदसेवा वसतिगृहात असेल. उद्या(शनिवार, 28 ऑक्टोबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
बबनराव ढाकणे हे सामान्य शेतकरी कुटुंबातले… पाथर्डीतील पागोरी पिंपळगावमधील सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.त्यांच्या घरात राजकीय वारसा नव्हता. पाथर्डीतील हिंद वसतिगृहात राहून त्यांनी शिक्षण घेतलं. नानासाहेब गोरे, सेनापती बापट, शिरू लिमये यांच्या नेतृत्वातील गोवा मुक्ती संग्रामातही बबनराव ढाकणे यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे ते ओढले गेले. 1958 साली यशवंतराव चव्हाण हे भगवानगडावर आले होते. तेव्हा बाशासाहेब भारदे आणि निऱ्हाळी यांची यांनी त्यांचा परिचय करून दिला अन् बबनराव ढाकणे काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.
पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभा पुढे लोकसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. महाराष्ट्राच्या बांधकाम खात्याचे ते मंत्री राहिले. ग्रामविकास खातंही त्यांच्याकडे होतं. जनता पक्षाचे ते अध्यक्षही राहिले. तत्कालिन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये बबनराव ढाकणे केंद्रीय उर्जा राज्यमंत्री राहिले. जनता दल, जनता पार्टी, काँग्रेस, शेतकरी विचार दर, राष्ट्रवादी या पक्षांमध्ये त्यांनी काम केलं आहे.