भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेतून भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त विधान केलं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान वसंतराव देशमुख यांनी केलं. त्यानंतर थोरातांच्या कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर आज संगमनेरमध्ये बोलताना सुजय विखे यांची वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी बाळासाहेब थोरात यांना थेट इशारा दिला आहे. घटनेचं राजकारण करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गुन्हा दाखल करा मागणीसाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात बसावं लागतंय. मात्र आपलं ठेवायचं झाकून दुसर्याच पाहायचं वाकून… असं संगमनेरचं नेतृत्व आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात यांची लेक जयश्री थोरात यांच्यावर टीका करणाऱ्या वसंतराव देशमुख यांच्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. वसंतराव देशमुख आमचे समर्थक नाहीत. ते काँग्रेसचे सदस्य आहेत. कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्या विधानाच समर्थन आम्ही करत नाही…, असं विखे पाटील यांनी म्हटलंय.
वसंतराव देशमुख यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिलंय. महिलांबाबत अवमानकारक भाषण करणे चुकीचे आहे. वसंत देशमुख काँग्रेसचे सदस्य, पक्षाने कारवाई करावी. देशमुख बोलले यामागे राजकीय षडयंत्र आहे. अर्ध्यातासात थोरातांचे गुंड कसे आले? थोरातांचा पीए , त्यांचे भाऊ इंद्रजीत थोरात त्यात होते. तुमचा पर्दाफाश झालाय. सुजयवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. महिला , कार्यकर्त्यांना मारहाण झाली. याची चौकशी व्हायला पाहिजे. मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा लागेल, असं राधाकृष्ण विखे म्हणालेत.
निवडणुकीची गावपातळीवर तयारी करा. दडपशाही गाडण्यासाठी परीवर्तन गरजेचं आहे. गावागावात जावून सांगा, टायगर अभी जिंदा है… तालुक्यातील दहशत आता संपवावी लागेल. आमच्या मतदारसंघात येऊन शिव्या देणं तुमचं चालतं. हाच का तुमचा सुसंस्कृतपणा? आमचं नाही तर तुमचं दहशतीचं झाकण उडवावं लागेल. यांचा खरा दहशतवादी चेहरा समोर आला. तुम्ही यंदा सामान्य माणसाच्या नादी लागला आहात. आता गाठ आमच्याशी आहे, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना दिला आहे.