भाजपाचे आमदार सुरेश धस यांची तोफ पुन्हा धडाडली. हार्वेस्टर अनुदान घोटाळ्यात त्यांनी बीडचे दोन आका असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी नव्याने बॉम्ब टाकल्याने पु्न्हा एकदा आरोपांचे मोहळ उठले आहे. खंडणी, धमकीचा परळीचा पॅटर्न समोर येत असताना आता हार्वेस्टर अनुदान घोटाळ्याचे बीड कनेक्शन समोर आले आहे. तर शनिवारी रात्री औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवले आहे. या अपघातात सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. त्यावर हा अपघात आहे की घातपात याचा शोध घ्यावा, असे मत धसांनी व्यक्त केले.
दोन्ही आकाचा सहभाग
तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ऊसतोडणी यंत्रास 35 लाख रुपयांचे अनुदान मिळवून देतो, असे आश्वासन देत वाल्मीक कराडने सोलापूर जिल्ह्यातील 40 हून अधिक शेतकऱ्यांकडून 11 कोटी रुपये वसूल केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी सुरेस धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडवर तोफ डागली.
141 मशिन द्यायचे होते आणि यांनी 5000 लोकांकडून आठ लाख रुपयांप्रमाणे पैसे जमा केले. या फसवणूक प्रकरणात पहिला गुन्हा पंढरपूर तालुक्यात दाखल झाला आहे. अजून देखील गुन्हे दाखल होणार आहेत. ज्यांनी पैसे घेतले त्याला पुराव्याची गरज नाही. जे लोक पैसे परत घ्यायला गेले त्यांना मारहाण करून परत पाठवून दिले, असा आरोप सुरेश धस यांनी केला. आका आणि त्यांचे आका हे दोघेही या प्रकरणात सहभागी आहेत. करोडो रुपयांचा घोटाळा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे, अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली. ते शिर्डीत माध्यमांशी बोलत होते.
हा अपघात की घातपात?
परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री अपघात झाला. सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले. त्यात क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. त्यावर सुरेश धस यांनी पुन्हा एकदा परळी पॅटर्नवर भूमिका घेतली.
बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात चालू आहे याचा करिश्मा बघा, असे ते म्हणाले. रात्री झालेली घटना घातपात की अपघात याचा शोध अजून लागायचा आहे. परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टिप्पर बंद नाहीत. या अवैद्य व्यवसायांना परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी याला जबाबदार आहे असा आरोप धसांनी केला.