भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मुलगी जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली आहे. बाळासाहेब थोरात यांची लेक जयश्री यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी असं काय केलं होतं की, माझ्याबद्दल असं बोलावं?, असा सवाल जयश्री थोरात यांनी उपस्थित केला आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करणाऱ्यांना कोणीही स्वीकारणार नाही. आम्ही थोरात साहेबांची माणसं आहोत. आम्ही संयम ठेवतो आहे, असंही त्या म्हणाल्या. संगमनेरमध्ये जयश्री थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काल जे काही विधान करण्यात आलं आहे ते कुणालाही न शोभणारं आहे. तुम्ही म्हणता की महिलांना 50 % आरक्षण द्यायचं पण जर असं बोलणारे लोक असतील तर महिलांनी का राजकारणात यायचं? मी काय वाईट करत होते? मी माझ्या वडिलांसाठी मैदानात उतरले. मी तरूणांना भेटत आहे. असं काय केलं होतं, की माझ्याबद्दल एवढं वाईट बोललं जावं. त्यांनी जे विधान केलं ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? तुम्ही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात आणि भाषणामध्ये तुम्ही अशी गलिच्छ विधानं करतात. त्यांच्या वयाला हे शोभणारं नाही, असं जयश्री थोरात म्हणाल्या आहेत.
भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं विधान वसंतराव देशमुख यांनी केलं आहे.
जयश्री थोरात यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. मोडतोड झालेल्या वाहनांची सुजय विखे पाटील यांनी पाहणी केली. काल हल्ला झालेल्या गाडीमधून प्रवास करणा-या कार्यकर्त्यांची विचारपूस केली. यावेळी हा हल्ला पुर्वनियोजित होता. ज्यांनी हल्ला केला ते थोरातांचे बंधू आणि काही जवळचे कार्यकर्ते होते. कार्यकर्त्यांना रस्तावर घेरून मारहाण केली गेली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली गेली. माझ्यावरही हल्लाचा प्रयत्न झाला मी पर्यांयी मार्गाने आलो. संबधित पुरावे निवडणुक आयोगाला देणार आहे. दंगल घडवणा-यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे.