मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या ग्रामीण भागात दौरा करत आहेत. मनोज जरांगे यांची अहमदनगरच्या पारनेरमध्ये मराठा संवाद सभा होतेय. या संवाद सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमच्या विरोधात कोणी गेले तर त्याचा सुफडा साफ करत असतो. तो जामनेरचा म्हणतो माझे खूप लाड केले. काय लाड केले? फडवणीस साहेबाला मी सहा महिन्यांपासून बोललो नाही. काय करताल जेलमध्ये टाकताल? तर जेल मध्ये आंदोलन करेल, कैद्यांना आरक्षण समजूल सांगेल. भुजबळ कुठे गेला काय माहिता… हिमालयात गेला काय? आता मराठ्याबद्दल बोलला तर सुट्टी नाही, असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलंय.
आरक्षण समजून घेतले पाहिजे. राज्यात लाखो नोंदी सापडत आहेत. आज नोंदी सापडल्यामुळे घराघरातील मराठयांना आरक्षणचा फायदा होत आहे. कोणापुढे हात पसरायचा नाही. 75 वर्षात आरक्षण असूनही दिले नाही. शंभर दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी सापडत आहेत. ते आपल्या आरक्षणात घुसले आहेत. दुसऱ्याच्या नादात आपल्या लेकरांना फाशी घ्यायची वेळ आली आहे. आज एक ही नेता आपली आरक्षण बाजूने बोलत नाही. यांना आपल्या बाप जाद्यांनी मोठे केले आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आंदोलन आता शेवटच्या टप्प्यात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी मला शत्रू मानायला सुरुवात केली आहे. तुम्हाला माहितीये मी मॅनेज होत नाही. त्यांचे एकच स्वप्न आहे याला बाजूला काढा… पण मला अटक करायला आणि न्यायला हिंमत लागते. माझी एसआयटी लावली माझ्याकडे आहे काय? गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शहाणे व्हावे. मला माहिती मिळाली. गृहमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत. ते जेसीबीवर गुन्हे दाखल करत आहेत. मुंबई गेलो तेव्हाचे आता गुन्हे दाखल करत आहेत. या राज्यात भावनिक लाट येणार आहे आणि तुमचा सुफडा साफ होणार आहे, असा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय.
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला घडवण्याचा प्रयत्न करणार होते. आमची मागणी आहे ते देत नाहीत आणि 10 टक्के आरक्षण मान्य करा म्हणतात. सरकारला चारी बाजूने घेरायचे आहे. आता समाज लोकसभेला फॉर्म भरणार आहेत, तो माझा निर्णय आहे. पुढील भूमिका काय ठरवायची यासाठी उद्या अंतरवाली सराटी या… नऊशे एकरवर सभा होणार आहे. सहा कोटी मराठे एकत्र येणार आहेत, असं जरांगे म्हणाले.