आज लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरु आहे. तर अनेक ठिकाणी प्रचाराला पण जोर चढला आहे. राज्यातील विविध भागात आज प्रचारसभांचा धुराळा उठला आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्षांनी राज्य पिंजून काढण्याचा चंगच बांधला आहे. आकाशातून सूर्य सुद्धा आग ओकत आहे. राज्यातील अनेक शहरात पाऱ्याने 40 ओलांडली आहे. पण प्रचार थांबलेला नाही. भर उन्हात प्रचार सभा होत आहे. अशाच एक प्रचार सभेला आलेल्या लोकांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आल्याचे दिसून आले.
शिर्डीतील सभेत घडला प्रकार
शिर्डीत महाविकास आघाडीची सभा होती. ही सभा भर दुपारी होती. दुपारीच या सभेसाठी लोकांनी गर्दी केली. भर उन्हात मविआचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ राहाता येथील बाजारतळावर सभा घेण्यात आली. सभा भर उन्हात असल्याने लोक पाण्यासाठी व्याकुळ झालेले पहायला मिळाले .200 रुपये घ्या पण पाणी द्या, अशी म्हणण्याची वेळ सभेला आलेल्या लोकांवर आली. या सभेत पाण्याची बॉटल वाटप करण्यात येत होत्या. पण तरीही अनेक लोकांपर्यंत पाणी पोहचले नसल्याने त्यांचा जीव कासावीस झाला.
‘जुमल्याचे नाव आता गॅरंटी’
या प्रचार सभेत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘जुमल्याचे नाव आता गॅरंटी’ असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा तातडीने कर्जमाफी केली गेली. ही ठाकरे गॅरंटी असल्याचे ते म्हणाले.मविआ सरकारने नुकसान भरपाई दिल्याचे सांगत आताच्या सरकारवर शेतकरी, महिला, युवा आणि गरीब कोणीच खूश नसल्याची टीका केली. दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, गोळीबार करण्यात येत आहे. अन्नदात्यावर अमानुष अत्याचार हे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अडीच वर्षात कृषीमंत्री दिसले का?
गेल्या अडीच वर्षांत कृषीमंत्री कधी बांधावर दिसले का, त्यांना कोणी पाहिलं का? त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे का, असा चिमटा त्यांनी काढला. राज्यातील जनतेला अडीच वर्षांपासून कृषीमंत्री कोण आहे, हे माहिती नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. महाविकास आघाडीने गारपीट असो वा अवकाळी, तातडीने शेतकऱ्यांना मदत केल्याचे दाखल त्यांनी यावेळी दिले.