विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्माराव आत्राम यांच्या विरोधात भाग्यश्री यांना शरद पवार तिकीट देण्याची शक्यता आहे. शरद पवार गटातील काही लोक माझं घर फोडायचा काम सुरू आहे. जी मुलगी माझी होऊ शकली नाही ती इतरांनाही काय होणार? यांना आपण प्राणहिता नदीत वाहून देऊ, असं म्हणत आत्राम यांनी त्यांच्याच लेकीवर टीकास्त्र डागलं. त्यावर आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. अष्टविनायकपैकी एक असणाऱ्या सिद्धटेक गणपतीचं रोहित यांनी दर्शन घेतलं. यावेळी रोहित पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
जो व्यक्ती आपल्या पोटच्या मुलीबाबत पाण्यात बुडवण्याची भाषा करतो. त्यावरून त्यांची विचारधारा काय आहे, हे समोर येत आहे. भाग्यश्री आत्राम यांनीच शरद पवार साहेबांसोबत येण्यासाठी पुढाकार घेतल्याचं समजत आहे. मात्र सर्वस्वी निर्णय हा शरद पवार यांचा आहे. आम्ही कुणाचंही घर फोडलेल नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिद्धटेक गणेश मंदिरात पूजा करून स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. या स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन ग्रामदैवत मंदिरात स्वच्छता केली जाणार आहे. तसंच संतांचे विचार हे तिथल्या नागरिकांच्या मनात रुजवले जाणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिले आहे. राज्यामध्ये सध्या महापुरुषांचा अवमान केला जातोय, या गोष्टीचा विरोध करण्यासाठी यात्रा काढली असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.
येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळे एजन्सीच्या माध्यमातून माझ्यावर कारवाई होऊ शकते. मात्र आम्ही ज्या कंपन्या उभ्या केल्या. या कष्टाने आणि तिथे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून उभा केल्या आहेत. मात्र राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केली. तर इतरांनी देखील आपण काचेच्या घरात राहतो हे विसरू नये. त्यांनी ज्या कंपन्या उभा केलेला आहेत, त्याबाबत मी आता बोलणार नाही. मात्र त्याचं पुस्तक माझ्याकडे तयार आहे, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.