विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अहमगनगरमध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं आहे. संगमनेरमधील धांदरफळमध्ये माजी खासदार, भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर संगमनेर मतदारमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर जयश्री थोरात यांनी या विधानाचा निषेध केला आहे. रात्रभर त्या पोलीस स्टेशनबाहेर बसून होत्या. त्यांनी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर पहाटेच्या सुमारास वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आल्यानंतर संगमनेरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. वसंतराव देशमुख यांनी थोरातांच्या मुलीवर टिका करताना पातळी सोडल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपची सभा सुरू असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभा बंद पाडली. सभा आटोपून परत जाणा-या सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या अडवल्या गेल्या. या गाड्यांची तोडफोड करत चिखली गावाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. रात्री दहा वाजेपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन अद्यापही सुरूच आहे. जयश्री थोरात, बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे आणि त्यांचे पती डॉ. सुधीर तांबे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्या समोरच बसून आहेत. बाळासाहेब थोरात यांची कन्या आणि बहिणीने पूर्ण रात्र काढली पोलीस ठाण्यासमोर बसून काढली आहे. पोलिसांनी गुन्हा दखल करण्यास विलंब केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणाले. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे.