अहमदनगर : अहमदनगरमध्ये खासदार अमोल कोल्हेंच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या प्रयोगाचा समारोप झाला. पण यानंतर नगरच्या राजकारणात क्लायमॅक्सची सुरुवात झाल्याचं बोललं जातंय. कोल्हेंनी जाहीरपणे निलेश लंकेंना शरद पवारांच्या गटातून खासदारकी लढण्याची ऑफर दिलीय.
नगरमधल्या महानाट्याच्या प्रयोगावेळची ही आतषबाजी महायुतीत ठिणग्या पेटवू शकते. नगर लोकसभेतून भाजपचे सुजय विखे पुन्हा खासदारकीसाठी सज्ज आहेत. दुसरीकडे अजित पवार गटाच्या निलेश लंकेंनीही दंड थोपटलेयत पण निलेश लंके आणि सुजय विखे हे दोघं आता युती धर्मात एकत्र आहेत. तिकीटासाठी दावे दोघांचे आहेत, मात्र नगरची जागा एक.
नगरमध्ये आमदार लंकेंनी डॉ. अमोल कोल्हेंच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन केलं. चार दिवस महानाट्य चाललं. नगरकरांनी तुफान प्रतिसाद दिला. वाढदिवस आणि महानाट्याच्या माध्यमातून निलेश लंकेंनी भाजपच्या विखे पिता-पुत्रांना शह देण्यासाठी शक्तिप्रदर्शन केलं. कार्यक्रमस्थळी फक्त लंके आणि त्यांच्या पत्नी या दोघांचेच मोठे कटआऊट लागले. तर लंकेंच्या इतर बॅनर्सवर अजित पवारांसोबत शरद पवारांचेही फोटो झळकले. त्यात समारोपाच्या कार्यक्रमात कोल्हेंनी लंकेंना थेट शरद पवार गटाकडून लोकसभा लढण्याची ऑफर दिली.
लंके स्पष्ट बोलत नसले तरी नगरमध्ये ते कोणत्याही स्थितीत लोकसभा लढणार असल्याची चर्चा आहे. भाजपकडून पुन्हा सुजय विखेंचं नाव चर्चेत आहे. विखेंना तिकीट मिळाल्यास निलेश लंके शरद पवारांच्या तुतारी चिन्हाकडून उभे राहू शकतात असं बोललं जातंय. महानाट्याच्या कार्यक्रमात विखेंचे पक्षांतर्गत विरोधक राम शिंदे, ठाकरे-काँग्रेससह शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून भेट देत लंकेंना शुभेच्छा दिल्या आणि अमोल कोल्हेंनी लंकेच्याच मंचावरुन निवडणुकांवर भाष्य करत मोठे संकेतही दिलेत.
गेल्यावेळी नगर लोकसभेसाठी भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांमध्ये सामना झाला होता. विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतं पडली होती. विखेंचा 2,81,474 विजय झाला होता. मात्र 2019 ला मविआच्या सरकारनंतरच निलेश लंकेंनी लोकसभेची तयारी करणं सुरु केलं होतं. कोरोनाकाळात लंकेंनी केलेली कामंही चर्चेत राहिली. त्यातून पारनेर मतदारसंघाबाहेर लंकेंचा संपर्कवाढीस मदत झालीय. शिवाय शरद पवारांचा फोटो वापरु नये म्हणून अजितदादांच्या नेत्यांना शरद पवारांनी स्पष्ट ताकीद दिलीय. मात्र निलेश लंके हे असे एकमेव आमदार आहेत, ज्यांच्या बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो झळकतोय. आणि त्यावर शरद पवारांचे नेते आक्षेपही घेत नाहीयत. म्हणून निलेश लंके काय निर्णय घेतात. यावर नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा होतायत.