अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण आता अहिल्यानगर झाले आहे. त्याची सर्वात अगोदर माहिती ट्विट करून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत दक्षिण अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपला खातं सुद्धा उघडता आले नाही. त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर आता शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी विखे कुटुंबियांनी पायाला भिंगरी लावून वातावरण निर्मिती केली. या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी महाविकास आघाडीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे हा बालेकिल्ला टिकवण्यासाठी विखे पाटील शर्थीने प्रयत्न करत आहेत. सलग सहा वेळा विखे पाटील यांनी या मतदारसंघात करिष्मा दाखवला आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे या मतदारसंघात रंगतदार लढतीची शक्यता आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील पराभवाचा वचपा काढणार?
शिर्डी लोकसभा मतदार संघात मोठा उलटफेर झाला. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील परभावाचा मोठा धक्का महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बसला. भाजपला खातं सुद्धा उघडता आलं नाही. त्यामुळे शिर्डी विधानसभा निवडणुकीत परभावाचा वचपा काढण्याचा प्रयत्न विखे पाटील करतील. श्री साईबाबा देवस्थानमुळे हा मतदारसंघ राजकीय पटलावर कायम चर्चेत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना उमेदवार अभय शेळके यांचा पराभव केला होता. त्यांनी 70 हजारांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली होती. त्यानंतर काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा 87 हजार मताधिक्यांनी विखे पाटील यांनी मोठा विजय मिळवला.
पण राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडल्या. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये डेरेदाखल झाले. काँग्रेस आता पक्ष बदलाचा वचपा काढण्यासाठी आसूसलेली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विखे पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान आहे. शिर्डी मतदारसंघात विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांच्या नावाची चर्चा आहे. बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांच्या कुटुंबियांचे चांगले संबंध आहे. शिर्डी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून प्रभावती घोगरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. विखे आणि घोगरे असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे विखे पाटील लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पायाला भिंगरी लावून काम करत आहेत. तर भाजपमधूनच डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे पण आव्हान विखे पाटील यांच्यासमोर असेल.
जातीय समीकरणं महत्त्वाची
शिर्डी विधानसभा निवडणुकीत मराठा, माळी, धनगर हे जातीय समीकरणं महत्त्वाचे ठरते. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाने अनेक लोकसभा मतदारसंघातील अंदाज पार धुडकावले. आता विधानसभेत ही मराठा फॅक्टर महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. पण या मतदारसंघात विखे पाटील यांची पाळंमुळं घट्ट आहेत. भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा एकवेळ फटका पण बसू शकतो. महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ही जाहीर न होणे आणि त्यापूर्वीच विखे यांनी हा मतदारसंघ पुन्हा पुन्हा पिंजून काढणे या जमेच्या बाजू आहेत.