मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी आरोप केले आहेत. ‘ मनोज जारांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकरबाळांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायच होत. त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती. वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं, त्याच्या आदल्या दिवशी ( जरांगे यांनी) मटण खाल्लं. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळी यायला निघालात त्यावेळी तुम्ही रात्री जेवण केलात’ असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला आहे. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघात केला. अजय महाराज बारसकर यांनी यापूर्वीही मनोज जरांगे यांच्यावर कडाडून टीका केली होती.
काय म्हणाले अजय बारसकर ?
मनोज जरांगे यांनी आरक्षणाचं आंदोलन निवडणुकीपर्यंत कसं भरकटवल यासाठी ही पत्रकार परिषद आहे. मला काही लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही एक महिनाभर शांत रहा, त्यांना त्यांच्या पद्धतीने आंदोलन करू द्या म्हणून मी शांत होतो. जरांगे यांच्यावर विश्वास होता म्हणून त्यांना एवढा मोठा पाठिंबा मिळाला, पण आता अश्या काही घटना घडल्या ज्याने त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. जरांगे यांनी लोणावळ्यात बंद दाराआड चर्चा केली. आरक्षणाचा लढा हा राजकीय लढा झाला. परवाच्या बैठकीला जे सच्चे मराठे गेले होते त्या लोकांनी जरांगे यांना शिव्या घातल्या आहेत. अशोक चव्हाण हे परवा रात्री तिकडे गेले, जरांगे यांना भेटले आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. तुम्ही म्हणाला होतात सीएम, डीसीएम सोबत फेसटाईमवर चर्चा केली आणि त्यावेळी मोबाईलवर मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केलं. अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली त्याच रेकॉर्डिंग जगासमोर आणा, असं बारसकर म्हणाले.
जरांगे यांची लढाई गोरगरिब मराठ्यांसाठी नव्हती
मनोज जरांगे यांची लढाई गोरगरिब मराठ्यांसाठी आणि लेकरबाळांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायच होत. त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती. त्याने जे काही सुरु केलं त्यानंतर मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावली गेली. एकेक मराठा अपक्ष उमेदवार उभा करण्याची पहिली डील झाली आणि आता मविआसोबत दुसरी डील सुरु आहे, असा आरोप बारसकर यांनी केला. मविआचा उमेदवार असेल तिथे उमेदवार उभा करणार नाही ही दुसरी डील सुरू आहे. यांच्या आंदोलनाचा चार दोन लोकांना फायदा झाला, असंही ते म्हणाले.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतही त्यांनी गौप्यस्फोट करत आरोप केले. वाशीमध्ये ज्यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं, त्याच्या आदल्या दिवशी मटण खाल्लं. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळी यायला निघालात त्यावेळी तुम्ही रात्री जेवण केलत. ज्यांच्या हाताने तुम्ही उपोषण सोडल त्या महिलेने तिसऱ्या दिवशी नवी कोरी गाडी घेतली. कुठून आले पैसे ?? असा खडा सवालही बारसकर यांनी विचारलं. तुम्ही आता फडणवीस साहेब फडणवीस साहेब म्हणायला लागले. एसआयटी चौकशीला घाबरलात, असा आरोप बारसकर यांनी जरांगे यांच्यावर लावला.
तो लोकांना भ्रमित करतोय
जरांगे पाटील लोकांना भ्रमित करतोय, असे टीकास्त्र बारसकर यांनी सोडले. ‘ तिकडे अरविंद केजरीवाल चौकशीला घाबरले नाहीत तुम्ही कशाला घाबरताय. हा दहावी बारावी छाप, पास झाला की नापास माहित नाही पण याने कसलही ज्ञान नसताना सगळ्यांना भरकटवलं. लोकसभेत आपलं काही गुंतल नाही. आरक्षण जे मिळणार आहे ते राज्यात मिळणार आहे अस ते म्हणाले.. खरच अस आहे का ? लोकसभेचा काहीच फायदा नाही का ? किती मराठ्यांना फायदा झाला हे जरांगेने सांगावं. वाशीम जिल्ह्यातली एक भगिनी आहे. तिला नायब तहसीलदार झाली होती पण कुणबी प्रमाणपत्रामुळे ती कलेक्टर झाली अस भ्रामक विधान त्याने कालच्या सभेत केलं. लोकांना भ्रमित तो करतोय असा आरोप बारसकरांनी केला. तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवतो ते सांग आम्हाला. बारामतीच्या डोक्यावर हात ठेवतो की आणखी कोणाच्या डोक्यावर हात ठेवतो, असा सवालही त्यांनी विचारला.