सातारा | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ग्रामपंचायतीचा धुरळा आज विरळ झाला. मिनी महापालिका म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाते. त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांचे मात्तबर नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची तर अजित दादा यांनी शरद पवार यांची साथ सोडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर आधीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घडामोडी नंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक. त्यामुळे ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणूक अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
ठाकरे गट सोडून गेलेल्या आमदारांची 50 खोके, सगळं ओके असे म्हणत हेटाळणी करण्यात आली. मात्र, या निवडणुकीत ठाकरे यांच्या गटापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. शिंदे गटाने एकूण 273 ग्राम पंचायतीवर विजय मिळविला आहे तर ठाकरे गटाकडे 140 ग्रामपंचायती आल्या आहेत.
राज्यात एकूण 2359 ग्रामपंचायत पैकी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीला 1372 ग्रामपंचायतीवर विजय मिळाला आहे. तर, कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचं ताब्यात 638 ग्रामपंचायती आल्या आहेत. तर अपक्षांनी आणि अन्य छोटे पक्ष यांनी 349 ग्रामपंचायतीवर विजय संपादन केला आहे.
राज्यात झालेल्या या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 146 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार होत्या. त्यातील 68 ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झालाय. त्यामुळे 78 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाल्या. सातारा जिल्ह्यात झालेल्या या निवडणुकीत सर्वाधिक 41 जागांवर भाजपचे कमल फुलले. त्या खालोखाल शिंदे गटाने 37 ग्रामपंचातीवर भगवा फडकवला. मात्र, अजित दादा यांच्या घड्याळाचा काटा एका जागेने कमी पडला. अजित दादा गटाकडे 36 ग्रामपंचाती आल्या.
सातारा जिल्ह्यात महायुतीने निर्विवाद आपले वर्चस्व राखले. तर, शरद पवार गटाने महाविकास आघाडीची लाज राखली. 24 ग्रामपंचायती जिंकून शरद पवार गट चौथ्या स्थानावर गेला. तर, कॉंग्रेसकडे अवघ्या चार ग्रामपंचायतीवर हाताचा पंजा उमटवला. परंतु, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे पुढील निवडणुकी नंतर आमदार नसतील असे आव्हान देणारे उद्धव ठाकरे यांचा करिष्मा मात्र सातारा जिल्ह्यात चालला नाही. उद्धव ठाकरे गटाला येथील निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही.