अजितदादा, शरद पवार पुन्हा एकत्र येणार? राष्ट्रवादी आमदाराच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

| Updated on: Dec 14, 2024 | 4:12 PM

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीनंतर अजितदादा आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या आमदारानं मोठं वक्तव्य केलं आहे.

अजितदादा, शरद पवार पुन्हा एकत्र येणार? राष्ट्रवादी आमदाराच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण
Follow us on

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या भेटीनंतर अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे.  त्यावर सुनंदा पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

कोणत्याही पक्षाचा आधारस्तंभ हा त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो. दोन्ही गटानं एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मला देखील तसंच वाटतं अजितदादा  यांची भेट झाल्यानंतर त्यांना मी शुभेच्छा देखील नक्की देणार आहे, असं सुनंदा पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भेटीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात काहीही घडू शकतं असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान या भेटीवर आता  अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळेक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सूचक विधान केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये, असं सूचक विधान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात काका मला वाचवा असं बोलणारे आता दादा मला वाचवा असं बोलत आहेत. भविष्यात जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध झाला तर प्रत्येक कार्यकर्ता हा आनंदी असणार आहे.

ठाकरे गटाची प्रतिक्रिया 

ठाकरे गटानं मात्र या भेटीवर आणि सुनंदा पवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सुनंदा पवार कोणत्या अर्थानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असं म्हटल्या, कौटुंबीक पातळीवर की राजकारणात? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच हे जर राजकारणाबाबत असेल तर महाविकास आघाडीत अस्वस्तता निर्माण होऊ शकते असंही त्या म्हणाल्या आहेत.