आरोप करणाऱ्यांच्या घरी आयाबहिणी नाहीत काय?; अजितदादा भडकले

| Updated on: Apr 21, 2024 | 5:28 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं. गेल्यावेळी नवनीत राणा विरोधी पक्षाकडून उभ्या होत्या. यावेळी त्या महायुतीकडून उभ्या आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे, असं अजितदादा म्हणाले.

आरोप करणाऱ्यांच्या घरी आयाबहिणी नाहीत काय?; अजितदादा भडकले
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अजितदादा अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं. आता तुम्ही नवनीत राणा यांना मतदान करा. आम्ही जर तुमचे कामे केले नाही तर आम्हाला विधानसभेमध्ये उभे करू नका. आम्हाला चले जावं म्हणा, असं सांगतानाच विरोधक नवनीत राणा यांच्यावर आरोप करतात. जे आरोप करतात त्यांच्या घरी आईबहिणी नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केला.

अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विरोधकांची चांगलीच फिरकी घेतली. संविधानाच्या मुद्द्यावरून अजितदादांनी विरोधकांचे चांगलेच कान टोचले. बाबासाहेबांनी या देशासाठी उत्तम संविधान दिलं आहे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाहीये. सांगायला काही नाही म्हणून घटना बदलणार असल्याचं विरोधक सांगत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

आधी म्हणाले, घड्याळ, नंतर म्हणाले, कमळ

अजितदादा हे नवनीत राणा यांचा प्रचार करण्यासाठी आले. पण बोलण्याच्या ओघात नवनीत राणा यांना विजयी करा म्हणताना घडाळ्याला मतदान करा असं अजितदादा म्हणाले. त्यानंतर चूक लक्षात येताच कमळाच्या चिन्हावर मतदान करा असं अजितदादा म्हणाले, त्यामुळे सभेत एकच हशा पिकला.

काय बिघडले माहीत नाही

2014 आणि 2019 मध्ये आम्ही मोदींना विरोध केला. तेव्हा 2014 मध्ये नवनीत राणा यांना आम्ही उमेदवारी दिली. 2019 मध्ये राणा यांना पाठिंबा दिला. आताही आमचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे नवनीत राणा विजयी होतील, असं अजितदादा म्हणाले. 2014 मध्ये निकाल यायच्या आधीच आम्ही भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला.पण आमच्या सहकार्याचे काय बिघडले होते मला माहीत नाही, असं अजितदादा म्हणाले.

विरोधकांकडे मुद्दाच नाही, म्हणून…

घटनेत दुरुस्ती करावी लागते. नेहरूंपासून ते मोदींपर्यंत सर्वांनी घटना दुरुस्ती केली आहे. लालबहादूर शास्त्री दोन वर्ष पंतप्रधान होते. त्यांनी तीन वेळा घटना दुरुस्ती केली. आतापर्यंत जवळपास 106 वेळा घटना दुरुस्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटना दुरुस्ती केली. मागास आयोगाची मुदत संपली होती. ती मुदत वाढवण्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागली. मागास आयोगाची गरज नव्हती का? महिलांना 33 टक्केआरक्षण देण्यासाठी दुसरी घटना दुरुस्ती केली. चांगलं झालं ना? महिला वर्ग 50 टक्के आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करणं गरजेचं होतं. अनेकांची सत्ता होती. आमचं सरकार आल्यावर महिलांना आरक्षण देऊ असं सांगत होते. पण कोणी दिलं नाही. तसं करायला धमक लागते. 370 कलम रद्द करण्यासाठी दुरुस्ती करावी लागली. जम्मू-काश्मीर आपला भाग होता. दुरुस्ती केली त्यामुळे आपण तिथे जमीन खरेदी करू शकतो. राज्य सरकारने तिथे जमीन घेतली आहे. महाराष्ट्र सदन आपण बांधणार आहोत, असं अजितदादांनी सांगितलं.