आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आता प्रचार सुरू झाला आहे. सध्या लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पुन्हा एकदा याच योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. योजना सगळी विचार करून सुरू केली आहे. मी दहा वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे, आजही अर्थमंत्री आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैशे देण्याचे काम केले, आम्ही त्या ठिकाणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही, करेक्ट कार्यक्रमाने माझ्या माय माऊलींना पैसे मिळणार नाहीत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
योजना सगळी विचार करून सुरू केली आहे. मी दहा वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे, आजही अर्थमंत्री आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैशे देण्याचे काम केले, आम्ही त्या ठिकाणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही, करेक्ट कार्यक्रमाने माझ्या माय माऊलींना पैसे मिळणार नाहीत. सांगायला खूप सोपं आहे, करेक्ट कार्यक्रम करतो, करेक्ट कार्यक्रम करायचं कोणाच्याही हातात नाही, ते जनतेच्या हातात आहे, करेक्ट कार्यक्रम कोणाचा करायचा ते. लाडकी बहीण योजना बंद करणार, असे म्हणतात, ती योजना काय तुमच्या काकाची आहे का? असा सवाल यावेळी अजित पवार यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वाळवा तालुका हा क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जाती- जातीत तेढ निर्माण करून कुठलाही देश , राज्य आणि जिल्हा पुढे जाऊ शकत नाही. घड्याळाची परंपरा मोडीत काढायची नाही, त्यामुळे सगळ्यांनी घड्याळ, घड्याळ करायचं. आम्ही सत्तेला हपापलेलो नाही, ताम्रपट घेऊन कोणी आले नाही. अल्पसंख्याक समाजात नेरिटीव्ही सेट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण आम्ही सगळ्यांचे आहोत, घटना घडतात, भांड्याला भांड लागतं संसार पुन्हा उभे राहातात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.