मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या संघर्षात अजितदादांनी उडी घेतली होती. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे यांच्याकडे दिले. तेव्हा अजितदादा विरोधी पक्षनेते होते. एका सभेत बोलताना अजितदादांनी आमदारांच्या बळावर कुणाला पक्षावर दावा सांगता येत नाही. तसं असेल तर मनसेचा एक आमदार आहे. तो फुटला म्हणजे पक्ष फुटला असे होत नाही. अजितदादा यांचे हे विधान अगदी पाच महिन्यापुर्वीचे. पण, 2 जुलैला त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत ४३ आमदार आले. यावरून आता दादांनीच राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितलाय. त्यावर शरद पवार गटानं त्यांच्याच त्या जुन्या व्हिडीओची आठवण करुन दिलीय. त्यांचा हाच व्हिडीओ शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे देणार असल्याची माहिती आहे.
विधानसभेत ‘काय झाडी, काय डोंगर’वरुन अजित पवारांनी शहाजी पाटलांना टोला लगावला होता. मोठे लोक कधी एकत्र येतील याचा नेम नाही, असे म्हणणारे अजित दादा हळूच सत्तेत येऊन बसले. जाहिरातीवरुन शिंदे फडणवीस सरकारला टार्गेट करणारे अजितदादा आता स्वतः जाहिरातींमध्ये आलेत.
अजित पवार यांनी विरोधात असताना केलेल्या अनेक विधानांमध्ये पूर्ण पक्षाचा उल्लेख केला. त्यावेळी अजित पवार यांची भूमिका आणि आत्ताच्या अजित पवार गटाच्या भूमिकेत मोठं अंतर आहे. मागच्या काही काळात विरोधी पक्षनेते असताना अजित पवारांनी केलेली काही विधानं ते प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर खरी ठरली.
माझ्या भाषणामध्ये बोलाल तर मंत्रीपदाचं स्वप्न दूर जाईल, असे अजित पवार यांनी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना खडसावलं होतं. दादा सत्तेत आले आणि आजपर्यंत गोगावले मंत्रीपदाची आस लावून बसले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. पक्षावरच्या दाव्यावरुन अजित पवार यांनी ५ महिन्यांपूर्वी ते विधान केलं होतं. शिंदे यांना शिवसेना कशी मिळणार असा प्रश्न करणारे अजित पवार यांनीच आता राष्ट्रवादीवर दावा सांगितला.
एकाच निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही बनले अशी टीका अजित पवार यांनी केली होती. नंतर स्वतः अजित पवार देखील अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही राहिले. स्थगितीवरुन कधी कुणावर काय वेळ येईल, कधी कोण सत्तेत येईल, असं अजित पवार यांनी शिंदेंना उद्देशून म्हटलं होतं. तेच नंतर खर ठरलं.
काळानुसार राजकीय भूमिका बदलतात. मात्र, अजित पवारांची ही विधानं सत्तेत जाण्याच्या फक्त ३ ते ४ महिन्यांआधीची होती. आता पक्ष आणि चिन्ह याचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेलाय. निवडणूक आयोग त्यावर निर्णय देईल तो देईल. पण, अजित पवार गटाची आत्ताची भूमिका आणि ३ महिन्यांआधीची भूमिका ही कायम त्यांची कोंडी करत राहतील.