माझ्यात वाईट गुण होते तर इतके वर्ष गप्प का बसलात ? असा सवाल विचारत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवारांनी फक्त एका वाक्यात उत्तर देऊन मुद्दा संपवला. आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली म्हणून आत्ता सगळ आठवतंय, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
पुण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील भाषणानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली. सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर देत विषयच संपवला.
बारामतीमध्ये सध्या पवार वि. पवार असा सामना रंगला आहे. या रणमैदानात आता पवार कुटुंबातच आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शरद पवार यांच्या कन्या, सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत गेलेले, महायुतीत सामील झालेले अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीला, सुनेत्रा पवार यांनाही बारामतीतील
निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये नणंद वि. भावजय अशी लढाई होत असून लेकीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. तर पत्नीला खंबीर पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांनीही जय्यत तयारी केली आहे. दोन्ही नेत्यांच्या सभांना, रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्योराप करत वातावरण ढवळून काढलं आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे ?
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका लागला असून खडकवासला येथील सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी भाजप आणि महायुतीवर निशाणा तर साधलाच पण अजित पवार यांच्यावरही
टीका केली. 17-18 वर्ष आम्ही ( सुप्रिया सुळे-अजित पवार) आम्ही एका संघटनेत काम केलंय. घटस्फोट होऊन सहाच महिने झाले आहेत. पण माझ्यातले असेअसे गुणे लोकं सांगत आहेत, जे मी कधी ऐकलेले पण नाहीत.
पण माझा त्यांना एक प्रश्न आहे, जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर 17- साडे सतरा वर्ष गप्प कशाला बसलात ? असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागलं? आत्ता माझ्या चुका का दिसत आहेत ? असा सवाल विचारत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला अजित पवारांनी आज प्रत्युत्तर दिलं.