विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यानंतर पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. काही मंत्रिपदावरून एकमत होत नसल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं बोललं जातं होतं. मात्र त्यानंतर अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक 19 मंत्री तर शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश होता. त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खाते वाटप देखील करण्यात आलं.
दरम्यान खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी या संदर्भात केलेल्या एका ट्विटमुळे चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. ‘दादा आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होता त्यावेळी कोयतागँगचा बंदोबस्त करुन कायद्याचं राज्य अस्तित्वात आहे हें सिद्ध करुन दाखवलं. यावेळी पुणे जिल्ह्यासोबत बीड व परभणी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारा जेणेकरून परत संतोष देशमुख प्रकरण या राज्यात होणार नाही’ असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
@AjitPawarSpeaks दादा आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होता त्यावेळी कोयतागँग चा बंदोबस्त करुन कायद्याचं राज्य अस्तित्वात आहे हें सिद्ध करुन दाखवलं. यावेळी पुणे जिल्ह्यासोबत बीड व परभणी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारा जेणेकरून परत संतोष देशमुख प्रकरण या राज्यात होणार नाही 😔 pic.twitter.com/dUB6SbW7VS
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 23, 2024
दरम्यान अमोल मिटकरी यांचं हे ट्विट मंत्री धनंजय मुंडेंसाठी धक्का मानलं जात आहे. कारण बीडचं पालकमंत्रिपद याहीवेळी धनंजय मुंडेंना मिळण्याची शक्यता आहे. मात्र असं असताना देखील अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रिपद स्विकारावं अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता बीडचं पालकमंत्रिपद कोणालाकडे जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
बीडच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव देखील आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र आता पंकजा मुंडे यांच्याकडे देखील मंत्रिपद असल्यामुळे बीडचा नवा पालकमंत्री कोण याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.