ठाणे | 29 ऑक्टोंबर 2023 : इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून घेतली आहे. राज्यात लोकशाही आघाडीचे सरकार होते त्या सरकारमध्ये मी मंत्री होतो. त्यावेळेला 2013 ते 14 च्या आसपास राणे समिती नेमली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची माहिती घेतली. राणे समितीने जो अहवाल दिला त्याआधारे त्या वेळच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण, ते उच्च न्यायालयात टिकू शकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला त्यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं होत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार होतं. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने काही बाबी समोर ठेवत आरक्षण नाकारलं. मराठा समाजाच्या मागणीला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. पण, दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावं असा आमचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रवादीचे (अजितदादा गट) प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आंदोलन करणं हा लोकशाहीमधील सर्वांचा अधिकार आहे. त्या सरकारमध्ये असताना आम्ही आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. आत्ताही आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका आहे. पण, ज्यावेळेला समाजाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. त्यावेळेला कोणीही वक्तव्य करताना कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे असा सल्ला त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिला.
विधानसभा अध्यक्षांकडे दोन याचिका दाखल झाल्या आहेत. यातील एक याचिका जयंतराव पाटील यांनी सुरुवातीला दाखल केली. राज्य मंत्रिमंडळात जे 9 मंत्री सहभागी झाले त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत कायद्यानुसार कारवाई करावी अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर आम्ही कायद्याच्या कसोटीवर तीन विधानसभा सदस्यांवर आमची पिटीशन दाखल केली. पुन्हा जयंतराव पाटील यांच्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उरलेल्या सदस्यांविरोधात अर्ज दाखल झाले, अशी माहिती त्यांनी दिली.
जयंत पाटील यांचा हा दावा म्हणजेच पिटीशन आमच्या प्रत्येक शब्दाचा क्लेश करण्याचा प्रयत्न आहे आणि सर्वात जास्त क्लेश हा ठाण्यातून होऊ शकतो. कायद्याच्या कसोटीवर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णयावरून आम्हाला खात्री आहे जो निर्णय होईल तो कायद्याच्या कसोटीवरच होईल. निवडणूक आयोगाचा पेपर फुटला म्हणून ठाण्यात काही लोक रडत होती. मोठा तांडव केला. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. खोटे अश्रू निर्माण करण्याचे काही महाभाग या परिसरात आहेत. ते संभ्रम निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात, असा टोला त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता लगावला.
राज्यात महायुती म्हणून आम्ही लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा तसं काही केलं असेल तर त्यावर हरकत घेण्याची काही हरकत नाही. राज्यात 45+ जागा महायुतीच्या आणायच्या आहेत. त्यामुळे योग्य वेळी जागा वाटपसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि तिन्ही पक्षांचे नेते मिळून योग्य तो निर्णय घेतील. हा निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य असेल असेही तटकरे म्हणाले.