कराड: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे राष्ट्रवादी विरोधात तक्रार केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र, या तक्रारीला अधिक महत्त्व देण्याची गरत नसल्याचं म्हटलं आहे. ठिक आहे ना. त्यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्याला फार महत्त्व द्यायचं काम नाही. आमच्याही पक्षात काय झालं तर आम्हीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे तक्रार करत असतो. हे चालत असतं. 24 पक्षाचं एनडीए सरकार होतं, यूपीए सरकार होतं, काँग्रेस आघाडीचं सरकारही होतं. त्यावेळीही भांड्याला भांडं लागायचं. एका कुटुंबात भांड्याला भांडं लागतं तर तीन पक्षात लागणारच ना. भांड्याला भांडं लागू नये म्हणून तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी प्रयत्न केला पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. नीटपणे सरकार चालवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार आज कराडमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना नाना पटोले यांनी राष्ट्रवादीची तक्रार पक्षप्रमुखांकडे केल्याचं सांगण्यात आलं. त्यावर अजितदादांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादीवर अजिबात टीका केली नाही. त्यांचा सर्व रोख शिवसेनेवर होता. त्याबाबतही पवार यांना छेडण्यात आलं. त्यांच्या मनात काय आहे ते मला माहीत नाही. उद्या तुम्हाला मी भाषण करायला सांगितलं. तुम्ही काही बोलला तर बाळासाहेबांनी विचारलं हाच विचार तुम्ही का मांडला. त्यावर मी काय उत्तर देऊ? मी अंतर्ज्ञानी नाहीये. आज सर्वांनी देशाचा, राज्याचा विकासाचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे. चव्हाण साहेबांनी जो विचार दिला जो रस्ता दाखवला त्या मार्गावरून चाललं पाहिजे. त्यावरून आपण भरकटत चाललो आहे. ते बरोबर नाही. शेवटी टाळी एकाच हाताने वाजत नाही. दोन्ही हाताने वाजते. उद्या कोणी काही केलं तर काहींनी समंजस भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही मला त्याबाबत विचारू नका. शेती पाऊस आणि विकासाच्या समस्यावर मला विचारा, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, कोयना नगर येथे कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते पर्यायी जमीन वाटप करण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, डॉ भारत पाटणकर हे मंचावर उपस्थित होते. 15 कोयना धरण ग्रस्तांना पर्यायी जागेच्या सातबाराचे अजित पवार यांचे हस्ते वाटप करण्यात आले. तब्बल 61 वर्षा नंतर कोयनेतील प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात आला.
राजस्थानच्या उदयपूर येथे काँग्रेसचं संकल्प शिबीर पार पडलं. या शिबिराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधींकडे राष्ट्रवादीची तक्रार केली. राष्ट्रवादीने भिवंडीत काँग्रेसचे कार्यकर्ते फोडले. भंडारा आणि गोंदियात भाजपसोबत हातमिळवणी करून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी आघाडी धर्माचं पालन करत नाही, असं पटोले यांनी सोनिया गांधींना सांगितलं आहे. तसेच या तक्रारीचे परिणाम येत्या काही दिवसात जाणवतील, असंही ते म्हणाले.