मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) बाहेर पडणार, भाजपासोबत जाणार, मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदेंच्या पोटात गोळा, शिंदे गटाची ताकद कमी होणार, अजित पवारांकडे ४० आमदारांचा पाठिंबा आहे, आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्र लवकरच अजित पवार राज्यपालांना देणार, या सगळ्या फक्त अफवा आहेत. आता काय मी स्टँप पेपरवर लिहून देऊ का, मी कुठेही जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक परिवार आहे आणि आम्ही परिवार म्हणूनच एकत्रित काम करू, असं स्पष्टीकरण विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिलंय. यासोबतच आज सकाळपासून सुरु असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिलाय.
मी आज मुंबईत विधानभवनात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इथे आलेत. मात्र ते त्यांच्या मंत्रालयातील कामासाठी आलेले आहेत. त्यामुळे मी भाजपसोबत जाण्याच्या केवळ अफवा आहेत. आता या गोष्टी थांबा त्याचा तुकडा पाडा. कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका. मी आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. परिवार म्हणून काम करतोय. उद्याही तसेच असूत. संभ्रमावस्था करू नका. आमचीही सहनशीलता कधी कधी संपते. त्याचा अंत होऊ देऊ नका.
पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे, पक्षाचं काम करत राहू, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय. तसंच राज्यात बेरोजगारी, महागाई, अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आदी ज्वलंत प्रश्न असताना लक्ष भरकटवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत, असं अजित पवार म्हणालेत.
राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटण्यासाठी दबाव टाकला जातोय, असं सूतोवाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरूनही बंडखोरीच्या बातम्य्यांना उधाण आले. अजित पवार यांनी यावरूनही कठोर प्रतिक्रिया दिली. आता मी त्या त्या पक्षाच्या प्रवक्त्यांना सांगणार आहे. तुम्ही फक्त तुमच्या पक्षाविषयी बोला. इतर पक्षांबद्दल बोलण्याचा त्यांचा अधिकार नाही. महाविकास आगाडीतील इतर पक्षांना लवकरच बोलणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातील एका बातमीनंतर आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आलाय. अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचं पाठबळ असल्याची बातमी झळकल्यानंतर तशा सूचक हालचालीही सुरु झाल्या. अजित पवार यांनी काल पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. आज ते विधानभवनात मुंबईत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मुंबईत निघाले. यामुळे सरकारमध्ये नक्की काही बदल घडणार अशा शक्यता वर्तवल्या गेल्या. मात्र सध्या तरी अजित पवार यांनी या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.