नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यात रायगडमध्ये बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे (Avdhut Tatkare) यांनीही नुकतेच शिवसेनेचे हाती बांधलेले शिवबंधन सोडत भाजपाचे कमळ हाती धरले आहे. नुकताच त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला असून आता पुतण्यानंतर काकाही पक्ष बदलणार का ? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. मंत्री उदय सामंत आणि सुनील तटकरे यांच्या भेटीवर अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय जीवनामध्ये नेत्यांच्या भेटीगाठी घ्यावा लागत असतात, राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असेल. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असं कळलंय. पण, या भेटीबाबत गैर अर्थ काढून बोलू नका,’ असे पत्रकारांना उद्देशून म्हटले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यावर भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. पक्षप्रवेश करण्यासाठी अनेकांच्या भेटीगाठी सुरू आहे.
त्यातच राष्ट्रवादी पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
अवधूत तटकरे यांचा पक्षप्रवेश होऊन काही तास उलटत नाही तोच राष्ट्रावादी कॉँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती आहे.
सुनील तटकरे हे कधीकाळी राज्यातील मंत्री होते, त्यांची दोन्ही मुले आमदार आहेत. ते स्वतः खासदार असून रायगडमध्ये त्यांचे मोठे वर्चस्व आहे.
एनसीपीतून सुनील तटकरे हे जाणार नाहीत, असा एकंदरीत सुर अजित पवारांच्या बोलण्यात असला तरी त्यांची प्रतिक्रिया सावध होती मात्र प्रतिक्रिया देतांना ते संतापल्याचे चित्र होते.