बारामती : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबीय यांचे वैर सर्वश्रुत आहे. पवार कुटुंबावर टीका करण्याची एकही संधी पडळकर सोडत नाहीत. मात्र, आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर थेट भाष्य करणे टाळले. परंतु, त्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘त्यांचे स्वागत आहे. त्यांची नेमकी काय भूमिका आहे ? कशा पद्धतीने ही भूमिका बदलली. हे एका दिवसात सगळं कळणार नाही. हळूहळू सगळं कळाल्यानंतर आपण त्यावर सविस्तर बोलू’, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.
मोदी @९ चा भाग म्हणून बारामती तालुक्यात ओबीसी चळवळीत काम करणाऱ्या प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला गोपीचंद पडळकर उपस्थित होते. मोदी साहेबांचे काम देशभर अखंडरीतीने चालू आहे. त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा दिल्लीपासून गावापर्यंत वाहत आहे. वेगवेगळ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहेत असे पडळकर म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षात दुफळी पडली हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. त्यांची नेमकी काय भूमिका आहे. कशा पद्धतीने त्यांची भूमिका बदलली. ते एका दिवसात सगळं कळणार नाही. हळूहळू सगळं कळाल्यानंतर आपण त्यावर सविस्तर बोलू असे पडळकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार राज्यभर दौरे करणार आहेत. या दौऱ्यासाठी त्यांना शुभेच्छा. ते जनतेतच आहेत. पण, जनतेने त्यांना एकतर्फी बहुमत आजवर दिलं नाही. ९९ ला पक्ष स्थापन केल्यापासून ते जनतेत होते आणि आता पुन्हा जनतेत राहणार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये एकदम जोरात चालू आहे. भाजपशिवाय आता पर्याय नाही. विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून छोट्या छोट्या घटकातील लोकांना नेतृत्व देण्यासह वेगवेगळे निर्णय घेणे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत भाजपचा हात कुणीही धरु शकत नाही. आजच्या घडामोडीनंतर हे काम अधिक जोमाने होईल असं पडळकर म्हणाले.