मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर अजित पवार आता आक्रमक पवित्र्यात दिसत आहेत. मुंबईतल्या वांद्रे येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत घडलेलं सर्वकाही उघड केलं. इतकंच काय तर शरद पवार यांच्यासह वरिष्ठांना इशाराच दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गुरुवारपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. त्यांची पहिली सभा दिलीप वळसे पाटील यांच्या अंबेगावात होणार आहे. या सभेच्या आयोजनामुळे अजित पवार चांगलेच संतापलेले दिसले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना इशारा दिला. त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा कलगीतुरा रंगताना दिसणार आहे.
“दिलीपरावांनी काय चूक केली आहे. मतदारसंघ बांधला आहे. मलाही थोडं बोलता येतं. भाषण करता येतं. लोकं माझं ऐकतात. उद्या जर त्यांनी दौरा सुरु केला तर मला पण तिथे सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल.मला उत्तर द्यावं लागेल. मी जर गप्प बसलो तर जनता बोलेल याच्यात काहीतरी खोट आहे. मी खोटा नाही.”, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
माझ्यासोबत येणाऱ्या आमदारांना धमकवलं जात असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. एका आमदाराला वरिष्ठांनी काय सांगितलं त्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. “तू निवडूनच कसा येतो ते बघतो. अरे तुमची मुलं ना ती..साथ दिली. ही भाषा दैवताने करायची. वरिष्ठांनी करायची. शेवटी तो आमदार म्हणाला मला नको आमदारकी मी घरी बसतो. ”
अजित पवार यांच्या सभेला 32 आमदारांनी हजेरी लावली होती. पण अजित पवार यांनी 40 हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आमदारांचं तळ्यातमळ्यात असल्याचं पाहून दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. आता पुढच्या राजकारणात कोण कोणाला धोबीपछाड करतो? हे दिसून येईल.
“2014 साली वानखेडे स्टेडियममध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला जाण्यास का सांगितलं? जर त्यांची साथ नको होती होती तर मला पाठवण्याची गरज नव्हती. 2017 मध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत एनसीपीकडून जयंत पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि मी होतो. तर भाजपाकडून मुनगंटीवार, फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि बावनकुले होते. त्यांनी आम्ही शिवसेनेसोबत 25 वर्षांपासून आहोत, त्यांची साथ सोडणार नाही. तेव्हा आम्हाला या बैठकीबाबत बाहेर काहीच सांगू नका असं सांगितलं गेलं.”, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केला.