सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष खरंच फुटीच्या मार्गावर? अजित पवारांचा आपल्या नेत्यांना सावधगिरीचा इशारा

| Updated on: Nov 04, 2022 | 4:31 PM

अजित पवार यांनी आपल्या पक्षातीन नेत्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष खरंच फुटीच्या मार्गावर? अजित पवारांचा आपल्या नेत्यांना सावधगिरीचा इशारा
विरोधी पक्षनेते अजित पवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे भरपूर घडामोडी घडत असल्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे तब्बल 12 नेते फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. “या सर्व नेत्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. पण हे 12 नेते फुटणार असल्याचं निश्चित झालंय. यामध्ये सोलापूरच्या बड्या नेत्याचा समावेश आहे”, असा धक्कादायक दावा शहाजीबापू पाटील यांनी केलाय. त्यांचा हा दावा कितपत खराय, ते आगामी काळात समजेलच. पण दुसरीकडे शिर्डी सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले पदधिकारी आणि कार्यकर्त्यांना या संबंधित महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे.

अजित पवार यांनी आपल्या पक्षातीन नेत्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. “ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत. आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका”, असं आवाहन अजित पवार यांनी दिलंय.

“जे पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होतोय. त्यांना वाटतं जे केलं ती चूक झाली. ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं योग्य नाही. शिवसेनाबाबत जे घडलं, त्याने नाव गेलं, हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही”, असं अजित पवार आपल्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार असल्याचा सर्वात आधी दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीतील चिंतन शिबिर संपल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा जयंत पाटील यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहजासहज फुटणार नाही. राष्ट्रवादी राज्यातील सर्वात मजबूत पक्ष आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते.