अधिकाधिक आमदार आणल्यावर मुख्यमंत्रीपद मिळालं असतं हे आधीच माहीत असतं तर अख्खा पक्षच घेऊन आलो असतो, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या या विधानाचे आता जोरदार पडसाद उमटत आहेत. त्यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अजितदादा यांचे विश्वासू सहकारी, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी आता मोठं विधान केलं आहे. अजितदादा पक्ष घेऊन आले असते. त्यांच्यात तेवढी ताकद आहे, असं सांगतानाच अजितदादांना घरातूनच डावलण्यात आलं, असा गंभीर आरोप धर्मरावबाबांनी माजी मंत्री शरद पवार यांच्यावर केला आहे.
धर्मरावबाबांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर हा गंभीर आरोप केला. अजितदादांनी व्यक्त केलेली खंत बरोबर आहे. त्यांनी नक्कीच संपूर्ण पक्ष आणला असता. त्यांची तेवढी ताकद आहे. अजितदादा 40 वर्षापासून राजकारणात आहे. पण त्यांना वारंवार डावलण्यात आलं. अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची संधीही होती. पण ती संधी त्यांना दिली गेली नाही. आपला मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं शरद पवार यांना वाटलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण त्यांना घरातूनच डावलण्यात आलं. त्यामुळेच अजितदादांची खंत बरोबर आहे, असं धर्मरावबाबा अत्राम म्हणाले.
मुख्यमंत्री बनवू
धर्मरावबाबा अत्राम यांनी यावेळी अजित पवार मुख्यमंत्री बनणार असल्याची भविष्यवाणीही केली. दोन अडीच महिन्यात निवडणुका आहेत. यावेळी आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. आमची ताकद वाढवू आणि अजितदादांना मुख्यमंत्री बनवू, असं धर्मरावबाबा म्हणाले. अजितदादा सीनियर आहेत. परंतु ज्युनिअर लोक त्यांच्या पुढे गेले. राजकारणात काहीही होते. मात्र जेव्हा चांगला काळ होता, आपला अधिकार होता तेव्हा त्यांना घरातून डावलण्यात आलं, असंही ते म्हणाले.
निर्णय घेण्यात मागे पडलो
अजितदादांनी त्यांना डावलण्यात आल्याची खंत आता बोलून दाखवली. महायुतीचं सरकार बनत असताना निर्णय घेण्यात आम्ही मागे पडलो. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. सर्वांनीच तेव्हा अजितदादांना समर्थन दिलं असतं तर आज अजितदादा मुख्यमंत्री झाले असते, असा दावाही त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत अजितदादा गट 90 जागा मागणार आहे. तसं धर्मरावबाबांनी बोलून दाखवलं. महायुतीची बैठक होईल. त्यावेळी चर्चेमध्ये कोण किती जागा लढवणार हे ठरलं जाईल. पण आम्हाला ज्या जागा मिळतील त्या निवडून आणण्याचा आमचा 100 टक्के प्रयत्न असणार आहे, असं सांगतानाच निवडणुकीनंतर कुणाला मुख्यमंत्री करायचं आणि कुणाला नाही हा महायुतीचा निर्णय आहे. महायुतीचे नेते तो निर्णय घेतील. वरिष्ठ पातळीवर काय बोलणं झालं मला माहीत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.