पुणे | 21 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांनी बहुमताच्या जोरावर पक्ष आणि निवडणूक चिन्ह मिळविल्यानंतर आता बारामती कोण जिंकतंय याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागणार आहे. बारामती लोकसभा निवडणूक जिंकण ही अजित पवार यांच्यासाठी अत्यंत जिकीरीची गोष्ट बनली आहे. यावर अजित पवार याचं भवितव्य अवलंबून आहे. त्यातच बारामती लोकसभेत अजितदादा यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उतरविण्याची तयारी सुरु आहे. यातच आता लोकसभा निवडणूकीमध्ये बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळें विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.
अजितदादा पवार हे अत्यंत महत्वाकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात. अजित पवार बारामतीत आपल्या बहिणीचा पराभव करण्यास उतरणार आहेत. यामुळे पवार कुटुंबातील ही लढत चुरसीची होणार आहे. अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या पक्षात मोठी फूट पाडून महायुतीत सरकारात भागीदार झाले आहेत. या लोकसभा निवडणूकीत जास्तीजास्त जागा निवडून आणून भाजपाच्या गुडबुक मध्ये सामील होण्यासाठी अजित पवार साम, दाम, दंड, भेद अशी नीती वापरणार असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांनी बारामतीच्या मतदारांनी यावेळी गडबड केली पुन्हा माझ्याकडे कामं घेऊन येऊ नका असा दमच दिला आहे. लोक भावनिक आवाहन करतील, शेवटची निवडणूक म्हणतील असेही धाडसी विधान अजित पवार यांनी करून काकांची नाराजी ओढवून घेतली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या शनिवारी दि. 24 फेब्रुवारीला बारामती लोकसभा मतदार संघातील भोर आणि वेल्हा तालुक्याच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्या दरम्यान शनिवारी भोर आणि वेल्हा तालुक्यात राष्ट्रवादीकडून कार्यकर्ता आणि भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शनिवारी दुपारी 1 वाजता भोर तालुक्यातील नसरापूर येथे हा मेळावा घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मेळाव्याच्या नियोजनासाठी भोर तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची भोरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक पार पडली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते रणजित शिवतरे, भोरचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आहे.
अजित पवार यांनी बारामती मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी सभा घेत भावनिक न होता मी सांगेल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन अजित पवार करीत आहेत. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर भोर आणि वेल्हा तालुक्यात 24 तारखेला पहिल्यांदाच अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याने, ते काय बोलतात याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.