Breaking News| अजित पवार पुन्हा कुठे गेले? पुण्यातला ‘हा’ कार्यक्रम रद्द, राजकीय चर्चांना उधाण

| Updated on: Apr 17, 2023 | 11:57 AM

पुण्यात आज अजित पवार एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Breaking News| अजित पवार पुन्हा कुठे गेले? पुण्यातला हा कार्यक्रम रद्द, राजकीय चर्चांना उधाण
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : पहाटेच्या शपथविधीबद्दल उघड उघड खुलासा टाळणारे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रत्येक हालचालींवर सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. अजित पवार पुन्हा एकदा भाजपसोबत मोट बांधू शकतात, या शक्यतांवर त्यांनी नुकतंच स्पष्टीकरण दिलंय. मात्र अजित पवार जेव्हा अचानक गायब होतात, तेव्हा दाल मे कुछ काला… दिसू लागतं. काही दिवसांपूर्वी अचानक १७ तास नॉट रिचेबल राहिले अन् आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं. पुण्यातल्या एका कार्यक्रमाचा दौरा त्यांनी अचानक रद्द केला.

या कार्यक्रमात अनुपस्थिती

पुण्यात आज अजित पवार एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती आहे. मात्र अजित पवार यांनी कार्यक्रम टाळल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार शेतकरी मेळाव्याला येणार नसल्यामुळे आयोजकांनी आयत्या वेळी शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित केलं. अजित पवारांचा आज पुरंदर तालुक्याचा नियोजित दौरा होता. मात्र अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.

नेमकं काय घडलं?

पुरंदर येथील कार्यक्रमात अजित पवार उपस्थित राहणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. अजित पवार यांचे फोटो असलेले बॅनर्सही जागोजागी झळकवण्यात आले होते. पण असं काय घडलं की अजित पवार यांनी त्यांचा नियोजित दौरा रद्द केला, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अजितदादांऐवजी शरद पवार आणि सुप्रिया सुळे आता या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

मध्यरात्री हॉस्पिटलला भेट

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नवी मुंबई येथील रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांना भेट दिली. खारघर येथील अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक भाविकांना उष्माघाताचा फटका बसला. या घटनेत १० पेक्षा जास्त नागरिक दगावले. तर असंख्य लोकं रुग्णालयात उपचार घेत आहेत. अजित पवार यांनी रात्री उशीरा उपचार घेत असलेल्या नागरिकांची भेट घेतली. त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला होता.

संजय राऊतांनी पुन्हा तोच दावा केलाय…

भाजपने शिवसेना जशी फोडली तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरु आहे. पक्ष सोडण्यासाठी आमदारांवर दबाव आणला जातोय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर दबाव आहे. या दबावामुळे ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी निर्णय घ्यावा, असं शरद पवार यांनी भेटीत सांगितल्याचा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केलाय.