पुणे : विरोधी पक्षनेते अजित दादा पवार आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध सुरू झालंय. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार लपून बसले होते, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांना आता अजित पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार म्हणतात, मी काही कुणाला घाबरत नाही. मग, चार दिवस कुठं लपून बसला होतात, असं चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना डिवचलं.
अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. अजित पवार यांच्या विरोधात भाजपनं राज्यभर आंदोलन केलं. पण, अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण तब्बल चार दिवसांनी दिलं. त्यामुळं अजित पवार चार दिवस लपून बसले होते, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांना राजकारण, समाजकारणाची आचारसंहिता लिहिले पाहिजे. ती सर्वांना लागू पडेल. आपोआपचं ती अजित दादा यांनाही लागू पडले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो, हे लक्षात घेतले पाहिजे.
अजित पवार म्हणाले, शुक्रवारी अधिवेशन संपलं. प्रेसशी बोललो. त्यानंतर मंगळवारी मुंबईला आलो. रविवारी सुटी होती. सोमवारपासून पुन्हा कामाला सुरुवात केली. कुणी काहीही टीका केली, तरी आपल्याला कळलं पाहिजे टीकेत किती तत्थ्य आहे ते. अजित पवार घाबरून बसणारा नाहीए.
पिंपरी चिंचवड येथे झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील आक्रमक झाले होते. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांना प्रश्नही विचारले होते. त्यानंतर अजित पवार यांनीही विधानसभेत चंद्रकांत पाटील यांचे चिमटेही काढले होते.