मुंबई : शिवसेनतून (Rebel MLA) बंडखोरी करीत शिंदे गटात सहभागी झालेले (Santosh Bangar) आ. संतोष बांगर हे गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत राहिलेले आहेत. कोण गद्दार म्हणाले तर त्याच्या कानशिलात लावा असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर हास्पीटलमधील बील कमी करण्यावरुन त्यांनी एका डॉक्टराला धमकी दिली होती हे कमी म्हणून की काय, सोमवारी त्यांनी निकृष्ट दर्जाचे भोजन कामगारांना दिले जात असल्याने एका उपहागृहाच्या व्यवस्थापकाच्याच कानशिलात लगावली. मात्र, या सर्वाचा समाचार विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) अजित पवार यांनी घेतला आहे. सरकार आलं म्हणजे मस्ती आली का असे म्हणत, त्यांना थांबवल कसं जात नाही असा सवाल त्यांनी शिंदे सरकारला विचारला आहे.
शिंदे सरकारमधील काही आमदारांना आपण एक सरकारचा भाग असल्याच विसर पडत आहे. कोण याला ठोका, त्याचा कोथळा बाहेर काढा असली भाषा वापरत आहे. एका लोकप्रतिनीधीच्या तोंडून ही भाषा शोभनीय नाही. आमदारांची अशी भाषा म्हणजे महाराष्ट्रात संघर्ष पेटवणारी आहे. कोण अधिकाऱ्यांना मारतंय तर कोण डॉक्टरांनाच धमकी देतयं असं म्हणत अजित पवार यांनी आमदारांच्या वर्तणुकीबद्दल सवाल उपस्थित केले आहेत. शिवाय हे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शोभणारे नसल्याचेही पवार म्हणाले आहेत.
सरकारमधील काही आमदार हे अरेरावीची भाषा करीत आहेत. लोकप्रतिनीधींनीच असे केले तर इतरांचे काय? एकदा नव्हे तर गेल्या महिन्याभरात अनेकवेळा अशा बाबी समोर आल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे काय अनभिज्ञ आहेत का असा सवाल उपस्थित करीत त्यांना वेळीच रोखलं गेले पाहिजे असे पवारांनी सुनावलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय समज देणार का हे पहावे लागणार आहे.
आता कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवण्याची जबाबदारी ही खासगी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. मात्र, कंत्राटदारांकडून कामगारांना खाण्यायोग्यही अन्न दिले जात नाही. हिंगोली जिल्ह्यातील एका उपहारगृहाला बांगर यांनी भेट दिली असती तेथील प्रकार उघडकीस आला आहे. मध्यान्ह भोजनात आळ्या आणि माशा पडलेल्या त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत उपहारगृहाच्या व्यवस्थापकास विचारणा केली असता हे चुकून झाले, येथून पुढे होणार नाही असे म्हणताच बांगर यांनी त्याच्या कानशिलात लगावली.