‘आम्ही तिघांनी लक्ष घातलंय त्यामुळं आता…’, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अजितदादांचा थेट इशारा

| Updated on: Dec 22, 2024 | 7:45 PM

काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. यावर बोलताना अजित पवार यांनी आता थेट इशारा दिला आहे.

आम्ही तिघांनी लक्ष घातलंय त्यामुळं आता..., सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अजितदादांचा थेट इशारा
Follow us on

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली. वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान शनिवारी अजित पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणातील मास्टरमांइट कोणीही असेल तो सुटणार नाही असं म्हटलं होतं. दरम्यान पुन्हा एकदा बारामतीमध्ये बोलताना त्यांनी इशारा दिला आहे. सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल बारामती राष्ट्रवादी काँग्रेस तालुका व शहरच्या वतीने शारदा प्रांगण येथे अजित पवार यांच्या  जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

बीडमध्ये सरपंचाची माणुसकीला काळिमा फासेल अशी घटना घडली, त्या घटनेचा मास्टरमाइंड कुणी असला तरी त्याची कितीही पोहच असली तरी त्याला सोडणार नाही. बीडच्या घटनेत आम्ही तिघांनी लक्ष घातलं आहे. अमानुष लोकांना फास्ट ट्रॅक केस चालून फाशीची शिक्षा होईल, अशी सजा त्यांना मिळेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, परभणीमध्ये घडलेल्या घटनेत देखील आम्ही लक्ष घातलं आहे. पोलीस यंत्रणेला देखील आदेश दिले आहेत, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  बारामतीत देखील अनेक घटना घडत असतात, त्यामुळे आई वडिलांनी मुलांकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

विरोधकांना टोला 

दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोला लागावला. विरोधकांकडून विधानसभा निकालानंतर सातत्यानं ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे, यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की,  जनता एकतर्फी कौल देईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. आम्ही कधीही इव्हीएमला दोष दिला नाही. लोकसभानंतर महायुती अधिक जोमाने कामाला लागली, लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आणि शेतकरी वर्गासाठी केलेल्या वीज माफीमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.