मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत ( उद्धव ठाकरे गट ) युती केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती केली असली तरी ते महाविकास आघाडीसोबत नाहीत. वान्चीमुळे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आंबेडकर यांनी कॉंग्रेससोबत येण्याचे आवाहन केले होते. त्यावर त्यांनी ना फोन, ना कबुतर अशी प्रतिक्रिया दिली होती.
लोकसभा निवडणुक जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची लवकरच चर्चा होणार आहे. त्यानंतरच कोणती जागा कुणाला याचा निर्णय होणार आहे. मात्र, त्याधीच प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आमदार नितीन देशमुख यांनी या बैठकीची माहिती देताना सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोला लोकसभा आणि जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला. यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली. भाजपला पराभूत करायचे असेल तर ही जागा नक्कीच शिवसेनेला मिळावी असे मत आम्ही मांडले असे त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात काँग्रेसचा पराभव होत आहे त्यामुळे ही जागा आपल्याकडे असावी. यावेळी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आहेच. पण, त्यांनी केवळ लोकसभेपुरतं राहू नये. विधानसभेलादेखील आपल्यासोबत सोबत राहायला हवं अशी भूमिका मांडल्याचे आमदार देशमुख म्हणाले.
अकोला लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी. जर शिवसेनेला ही जागा मिळणार नसेल आणि येथून वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर लढणार असतील तर आम्ही त्यांनादेखील विजयी करू. कोणत्याही परिस्थितीत भाजपला ही जागा जिंकू देणार नाही असेही आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले.