बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी कोर्टात धाव घेऊन दाद मागितली आहे. हा एन्काऊंटर फेक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आरोपीच्या वकिलाने तळोजा तुरुंगापासून ते चकमक झाल्याच्या ठिकाणापर्यंतचे सर्व दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य केली असून राज्य सरकारला तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला? याचे गूढ उकलण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई हायकोर्टात न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी सुरू होती. यावेळी आरोपीचे वकील अमित कटारनवरे यांनी तळोजा तुरुंगापासून ते एन्काऊंटर झाल्याच्या घटनास्थळापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. त्यावर कोर्टाने राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. आरोपीला तुरुंगातून बाहेर काढल्यापासून ते अक्षयच्या मृत्यूपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा. आरोपी त्याच्या बॅरेकमधून बाहेर आला, वाहनात चढला, कोर्टात गेला आणि नंतर शिवाजी हॉस्पिटलमध्ये त्याची बॉडी नेण्यात आली. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले तेव्हापासूनचे सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवावेत, अशी आमची अपेक्षा आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. यावेळी कोर्टाने तळोजा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली. तळोजा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज सुरू आहेत का? असा सवाल कोर्टाने केला.
पुरावे तकलादू
जे पुरावे आहेत ते फार तकलादू आहेत. तुमच्या आणि पोलिसांच्या कारवाईवर सर्वसामान्यांच्या मनात भ्रम आहे, असं सांगतानाच आजच्या सुनावणीत तुम्ही जे काही सांगितलं ते आणि पुढच्या सुनावणीतील युक्तिवाद यात तफावत आढळली तर सोडणार नाही, अशी ताकीदच कोर्टाने दिली आहे. पोलीस व्हॅनचा ड्रायव्हर आणि एन्काऊंटरवेळी जे चारजण उपस्थित होते. त्यांचा सीडीआर जमा करा, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
मग चौकशीची गरज काय होती?
अक्षय शिंदेविरोधात एन्काऊंटरच्या दिवशीच चार्जशीट फाईल केली होती. मग त्याची वेगळी चौकशी करण्याची काय गरज होती? या प्रकरणातील पोक्सोमधील आरोपींना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदे मारला गेला, असा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी गुंतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागणी वकिलाने केली. तर आम्हाला जर काही योग्य वाटलं नाही तर आम्ही योग्य पाऊल उचलणार, असं कोर्टाने म्हटलं आहे.