बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र या एन्काऊंटरवर विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केले होते. हातात बेड्या असताना अक्षयने बंदूक कशी हिसकावली, त्यातून फायरिंग कसे केले असे अनेक प्रश्न विचारत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अक्षयच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे एन्काऊंटर फेक असल्याचं त्यांनी म्हटलं. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी कोर्टात पार पडली. तेव्हा दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले. जे पुरावे आहेत ते फार तकलादू आहेत . तुमच्या आणि पोलिसांच्या कारवाईवर सर्वसामान्यांच्या मनात भ्रम आहे असे नमूद करत न्यायालयाने सरकारी वकिलांना फटकारले. चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही असा इशाराही न्यायालयाने दिला.
मुंबई उच्च न्यायालयात अक्षय शिंदे एन्काऊंटरवर सुनावणी सुरू आहे. सुनावणीसाठी अक्षयचे आईवडील कोर्टात हजर आहेत. यावेळी अक्षयच्या बाजूने वकील अमित कटारनवरे बाजू मांडली. तर महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू मांडली. आरोपीचे वकील अमित कटारनवरे यांनी याचिकेचं कोर्टात वाचन केलं. त्यांनी या एन्काऊंटरचा आणि त्यापूर्वीचा घटनाक्रम वाचून दाखवला.
न्यायालयाची दिशाभूल सहन केली जाणार नाही
यावेळी न्यायाधीशांनी सरकारी वकिलांच्या अनेक मु्द्यांवरून प्रश्न विचारत सराकरी वकिलांना फटकारले. चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही. न्यायालयाची दिशाभूल सहन केली जाणार नाही. आजच्या सुनावणीत जे काही सांगितलंय त्यात आणि पुढच्या सुनावणीत तर तफावत आढळली नाही तर सोडणार नाही असा इशारा हायकोर्टाने सरकारला दिला आहे. प्रथमदर्शनी हे काही एन्काऊंटरनाही. पोलिसांवर संशय नाही पण चौकशी योग्य व्हायला हवी असे सांगत तळोजा कारागृह ते रुग्णालयातील सगळे सीसीटीव्ही फुटेज हवे असे नमूद केले.
सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा
या संपूर्ण घटनेची सखोल माहिती घेण्यासाठी आरोपीला तुरुंगातून बाहेर काढल्यापासून ते मृताच्या वेळेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवावे असे निर्देश न्यायालयाने दिले. आरोपी अक्षय शिंदे त्याच्या बॅरेकमधून बाहेर आला, वाहनात चढला, कोर्टात गेला आणि नंतर शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेला, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले तेव्हापासूनचे सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवावे अशी आमची अपेक्षा आहे असे न्यायालयाने नमूद केले.
तसेच घटनेवेळी गाडीचा ड्रायव्हर आणि जे चार जण वेळी ऊपस्थित होते त्यांचा सीडीआर जमा करा असे निर्देशही न्यायालयाने दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता पुढच्या गुरूवारी होणार आहे.