मुंबईः गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू (School reopen)करणार असल्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलाय. विशेष म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत अनेकांचे दुमत होते. पण अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवलाय. पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. विशेषतः त्याची जबाबदारी ही शिक्षकांवर अधिक असणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरू होणार असल्याची माहिती दिलीय. त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील ८ वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेतला होता. त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा सुरू करण्यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता, मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. तसेच टास्क फोर्सशीसुद्धा चर्चा केली होती. त्या प्रमाणे ती फाईल मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत मुख्यंमत्री आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय.
ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवी या शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी लागणारी तयारी या काळात आम्हाला करता येईल. यापुढे महाराष्ट्रात पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील. अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेलेला आहे. दोन वर्षांनंतर सर्व शाळा सुरू करण्यात येत असून, त्यासंदर्भातली सर्व काळजी आम्ही घेणार आहोत, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्याच्या शिक्षण विभागानं आता पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिलीय. प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं मांडला होता, त्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या आरोग्य विभागानं परवानगी दिली होती. याशिवाय चाईल्ड टास्क फोर्सनं देखील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलीय.
(i) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
(ii) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
संबंधित शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
संबंधित बातम्या